डोंबिवली : यंदा डोंबिवलीतील हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. सुरूवातीपासून निघणाऱ्या या शोभायात्रेत यंदाही त्याच उत्साहात, हिंदू नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. .
यात्रेत स्व पंचसूत्री या संकल्पनेवर आधारित, स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंबन या समृद्ध व संस्कृती जीवनाच्या पंचसूत्रीवरील चित्ररथांचा समावेश करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, आठवडाभर धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाची रचना ही समाजाच्या सर्व घटकांतील सर्व वयोगटांना नजरेसमोर ठेवून केली आहे
स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला गणेश मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिक, सेक्रेटरी प्रवीण दुधे, गौरी खुंटे, श्रीपाद कुळकर्णी, मंदार हळबे, राजय कानिटकर, आनंद धोत्रे, आणि संयोजन समितीचे प्रमुख संयोजक अमेय काटदरे तसेच संयोजन समितीचे सदस्य दीपक काळे, शामल जोशी, अमित सराफ, चिन्मय कुलकर्णी, आकाश गायकवाड आणि मार्गर्शक जयकृष्ण सप्तर्षी उपस्थित होते.
वृंदावनचे प्रभूदेशदास धर्मप्रसारक महंत आचार्य प्रणयजी यावेळी नववर्ष स्वागत यात्रेचे विशेष अतिथी म्हणून डोंबिवलीकरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार असून तेही स्वागत यात्रेत सहभागी होतील. स्व वर आधारित स्वागत यात्रेची तयारी आणि कार्यक्रमाची रचना फक्त डोंबिवलीकरांसाठीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानसाठी नवीन जाणीव निर्माण करणारी ठरेल, अशी आशा संयोजन समितीने व्यक्त केली.
यावर्षीच्या स्वागत यात्रेत विविध प्रकारचे सुमारे ३० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत ८० विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, पर्यावरणीय क्षेत्रातील संस्थांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणून ढोल-पथकांनाही चौकांमध्ये ढोल वादनास परवानगी देण्याचा विचार आहे. संस्कार भारतीतर्फे गणेश मंदिरासमोर महारांगोळी काढण्यात येणार आहे. याच दरम्यान गणेश मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुढीपाडव्यापूर्वी अगोदर एक आठवडा ते रामनवमीपर्यंत आयोजित केले आहेत.
दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या देव-देशोपासनेच्या कार्यक्रमाने या वर्षीच्या उत्सवाची सोमवारी (दि.24) रोजी सुरूवात झाली. मंगळवारी (दि.25) रोजी डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी सामुदायिक उपासनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी गणेश मंदिरात सप्तशती पाठ आणि श्रीसुक्त यांचे सामुदायिक पठण करण्यात आले, ज्यात मातृशक्तीचा सहभाग फार मोठा होता.
विशेष उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर २७ मार्च पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी पूजा सिनेमागृहात छावा चित्रपटाचे मोफत प्रदर्शन केले आहे. लहान मुले विशेषतः पुढच्या पिढीवर आपल्या परंपरेचे संस्कार व्हावेत, छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्य निष्ठा या पिढीत रुजावी, या हेतूनेच आपण आपल्या या वर्षीच्या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
२८ मार्च रोजी संध्याकाळी भक्तिगीत व कीर्तनाचा कार्यक्रम गणपती मंदिरासमोर संपन्न होईल.
२९ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान बाईक-स्कूटर रॅली होईल. त्यानंतर संध्याकाळी संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त याच दिवशी शारीरिक प्रात्यक्षिके, कसरती, पोवाडे, ढोल वाद्य पथकांचे सादरीकरण करून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण केले जाईल.
रविवारी ३० मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी ५ वाजता गणेश मंदिरात महापूजा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते होईल. पालखी पूजन प्रातिनिधीक गुढी उभारणी आणि रामचंद्रांचे पूजन करून, पालखी डोंबिवली पश्चिमेला कान्होजी जेधे मैदान (भागशाळा मैदान) कडे प्रस्थान करेल. सकाळी ७ वाजता स्वागत यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर स्वागतयात्रा पश्चिमेकडील पंडित दीनदयाळ पथ, द्वारका हॉटेल, रेल्वे पूल मार्गे पूर्वेकडील शिवमंदिर पथ, राजेंद्र प्रसाद पथ, चार रस्ता मानपाडा रोडला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बाजी प्रभू चौक, फडके रोडवरून अप्पा दातार चौकात स्वागत यात्रेचा १०.३० वाजता समारोप होईल.
३० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान राम नाम जपयज्ञ आयोजित केलेला आहे.
गणेश मंदिरापासून नेहरू रोड, जोशी हायस्कूल पूलावरून पश्चिमेकडील गणेश नगर पोलिस चौकी, गणेश नगर पेट्रोल पंप, विकास म्हात्रे कार्यालयापासून डावीकडे अग्निशमन दल कार्यालय, श्रीधर म्हात्रे चौक, डावीकडे दोन टाकीपासून उजवीकडे उमेशनगर, रेती बंदर रोड, रेती बंदर चौकापासून डावीकडे नवीन विष्णूनगर पोलिस ठाणे, आनंद नगर उद्यान, सम्राट चौक, पंडित दीनदयाळ मार्गाकडून उजवीकडे राणा प्रताप स्वामी विवेकानंद शाळा, जोंधळे शाळा, साऊथ इंडियन शाळेकडून पूलावरून पूर्वेकडे टंडन रोड, टीप टॉप स्वीटकडून, डीएनसी शाळेकडे, प्रगती कॉलेजकडून डावीकडे कलावती आई मंदिर, नांदिवली मार्गाने नांदीवली नाल्यावरून डावीकडे पी अँड टी कॉलनी, हनुमान मंदिरापासून डावीकडे गांधी नगर, तरटे प्लाझा चौक गिरनार चौकातून उजवीकडे झाईका हॉटेलपासून मानपाडा रोडला असलेल्या आईस फॅक्टरीकडून अभिनव शाळा, एमआयडीसीच्या निवासी विभागातील पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी मार्गाने मिलाप नगरमधील ओमकार शाळा, आर आर हॉस्पिटल, छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाकडून शेलार नाका, मंजुनाथ शाळा, लोकमान्य टिळक चौक, ताई पिंगळे चौक (सर्वेश हॉल), ब्राह्मण सभा, मदन ठाकरे चौक, फडके रोड, गणेश मंदिर रोडने येऊन पथ गणेश मंदिर संस्थान जवळ रॅली विसर्जित होईल.