ठाणे

Thane Rain News | ठाण्याच्या ग्रामीण भागात मुसळधार; जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा
शहापूर : राजेश जागरे

शहापूर तालुक्यामध्ये शनिवारी (दि.६) रात्री मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. शहापूरमधून वाहत जाणाऱ्या भारंगी नदीला पूर आल्याने नजीकच्या गुजराती बागेतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. तर पार्किंगमधील ८ ते १० चारचाकी तर २५ दुचाकी वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान सर्व नियम पायदळी तुडवून भारंगी नदीपात्रात बांधकाम केल्याने नदीला पूर आला आणि ते पाणी गुजराती बागेतील घरांमध्ये शिरल्याने सदर बांधकाम तोडण्यासाठी रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा आंदोलनात सहभाग घेत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरली.

शहापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १५ च्या हद्दीतील शहापूर शहराचे भूषण असलेल्या भारंगी नदीपात्रात येथील ठेकेदार तसेच नगरपंचायत प्रशासनाने विकासाच्या नावाखाली नदीपात्रात अनधिकृत बांधकाम तसेच गणेश घाट आणि भिंती, बंधारा असे विविध बांधकाम करून नदीला बकाल स्वरूप आणले आहे. काम करीत असताना भातसा धरण विभाग, जलसंधारण, वनविभाग, पुर नियंत्रण विभाग आदी कोणत्याही खात्याची परवानगी न घेता शासकीय नियमांचे उल्लंघन करीत कामे करण्यात आलेली आहेत. त्यामुळे याचे दुष्परिणाम म्हणून शनिवारी (दि.६) पहाटे शहापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भारंगी नदीला मोठा पूर आला. नदी पात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे नदी पात्राची रूंदी कमी झाली आहे. नैसर्गिक नाले बुझले गेले आहेत.

परिणामी त्यामुळे शनिवारी (दि.६) रात्री ऐन साखर झोपेत असतांना येथील गुजराथी बाग परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. जनजीवन विस्कळीत झाले आहे. विज प्रवाह बंद झाला. चारचाकि व दुचाकी वहाने नदी पात्रात वाहुन गेली यामध्ये जवळपास पंधरा चारचाकी वाहनांचा समावेश आहे. तर माहुली नदीवरचा पुल देखील वाहून गेला आहे. नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शहापुरातील गुजराती बागेसह ताडोबा नगर, चिंतामण नगर, राहुल नगर आदी ठिकाणच्या अनेकांच्या घरांमध्ये २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचलेले आहे. तर २० ते २५ दुचाकी पाण्यात वाहून गेले आहेत.

SCROLL FOR NEXT