डोंबिवली, पुढरी वृत्तसेवा : मुसळधार पावसाने परतीच्या वाटेवर असणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असून रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने लोकल जवळपास एक तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना करत चाकर मान्यांना परतावे लागत आहे. तर कल्याण स्थानकात फलाट क्र. 1 च्या छतावरुन धबधब्यासारखे पाणी पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान या पावसामुळे कल्याण-डोंबिवली पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच उद्या अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन कसे पार पडेल याची काळजी भाविक सतावत आहे.
काही दिवस पावसाने विश्रंती घेतली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून सायंकाळी विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका नागरीकांना बसत आहे. कल्याण पश्चिमेतील मुख्य बाजार पेठेत पावसाचे पाणी साचले आहे. डोंबिवली स्थानक परिसर, चिकनघर परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्या नागरिकांनी अनेकवेळा महापालिकेकडे तक्रार करून महापालिका दुर्लक्ष करत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.