Ambernath Karpa Disease  Pudahri
ठाणे

Kalyan Dombivli Rain | मुसळधार पावसाने करपा रोगाचा धोका टळला: अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

भात पिके पाण्याखाली, मध्यरात्रीपासून कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार 

पुढारी वृत्तसेवा

Ambernath Karpa Disease

नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली असताना मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भात पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, जोरदार पावसामुळे भाताची शेती पाण्याखाली गेल्याने करपा रोगाचा संभाव्य धोका टळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ,कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भात शेतीची  लागवड झाली आहे. यंदा सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने भात पिकांची वाढ चांगली झाली होती. मात्र, गेल्या काही  दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात बदल झाला होता. पावसाची उघडीप आणि दमट वातावरणामुळे भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होती. 

विशेषतः श्री मलंगगड परिसरात भात पिकांवर करपा रोगाची लक्षणे दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास भाताच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकरी पुन्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवरील मोठं संकट दूर झालं आहे. 

दरम्यान, मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील अंबरनाथ,कल्याण तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून अनेक ठिकाणी भाताची रोपे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सध्या करपा रोगाचा संभाव्य धोका कमी होण्याची शक्यता आहे. पावसामुळे भात पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

मात्र, पुढील काही दिवसांत पावसाचे प्रमाण, वातावरणातील आर्द्रता आणि भात पिकांची स्थिती यावर रोगाचा प्रादुर्भाव अवलंबून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची नियमित पाहणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने संभाव्य संकट टळल्याने यंदाचे भात उत्पादन वाचण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT