ठाणे: राज्यभर सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका आता आरोग्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेषतः महामुंबई परिसरात डिहायड्रेशनमुळे किडनी व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
उष्ण आणि दमट हवामानामुळे शरीरातील तापमान दीर्घकाळ वाढून राहते, परिणामी थकवा, डोकेदुखी आणि रक्तदाब वाढण्याच्या तक्रारी वाढत आहेत. भारतात उष्णतेची लाट ही सामान्य बाब आहे. दरवर्षी मे-जूनदरम्यान भारतात तापमानवाढ दिसून येते.
मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा बसण्यास सुरू होतात. मात्र यंदाचा मार्च महिना उन्हाच्या बाबतीत विक्रमी ठरला. गेल्या 122 वर्षांमधील तापमानाचा उच्चांक यंदाच्या वर्षी देशाने गाठला.
द सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंट या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने देशात तब्बल 15 राज्यांना उन्हाची झळ बसली. महत्त्वाची बाब म्हणजे थंड हवामानासाठी ओळखले जाणारे हिमाचल प्रदेश हे राज्यही या यादीत होते. गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीचा पारा 44 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याचं नोंदवण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, सध्या मुंबई विभागात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. ग्रामीण भागातही याचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने धोका वाढला आहे.
तज्ज्ञांच्या मते, लहान मुले, वृद्ध तसेच हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेमुळे घाम जास्त येऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढतो.
काही गंभीर प्रकरणांत बेशुद्ध होणे किंवा मानसिक गोंधळही निर्माण होऊ शकतो. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचाही परिणाम दिसत असून, अचानक पावसाचे आगमन आणि तापमानातील चढ-उतार याचा परिणाम मानवासह वन्यजीवांवरही होत आहे.
भारतात अंदाजे 22 कोटी नागरिक उच्च रक्तदाबाने ग्रस्त
जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार, या संदर्भातील काही प्रमुख तथ्ये खालीलप्रमाणे आहेत. जागतिक रुग्णसंख्या पाहता जगभरात 30 ते 79 वर्षे वयोगटातील अंदाजे 1.28 अब्ज (1.28 ) प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत.
या रुग्णांपैकी दोन-तृतीयांश पेक्षा जास्त लोक हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांपैकी सुमारे 46% प्रौढांना त्यांना हा आजार असल्याचे माहीतही नसते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांपैकी 5 पैकी 1 पेक्षा कमी प्रौढांना (सुमारे 21%) हा आजार नियंत्रणात ठेवण्यात यश येते.
उच्च रक्तदाबामुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. हा स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे मुख्य कारण आहे. भारतात अंदाजे 22 कोटी नागरिक उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे अहवाल सांगतात.
उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाची लक्षणे
श्सतत थकवा व अशक्तपणा
डोकेदुखी, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे
अतिघाम व शरीरातील पाणी कमी होणे
मानसिक गोंधळ, एकाग्रता कमी होणे
गंभीर स्थितीत बेशुद्ध पडणे
उष्णतेपासून बचावासाठी उपाय
दिवसभरात भरपूर पाणी पिणे (किमान 3 ते 4 लिटर)
उन्हात बाहेर जाणे टाळणे, विशेषतः दुपारी 12 ते 4 दरम्यान
सैल, हलके आणि फिकट रंगाचे कपडे वापरणे
घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरणे
त्वचेवर थंड, ओले कापड ठेवणे
सावलीत किंवा थंड ठिकाणी विश्रांती घेणे
ओआरएस, नारळपाणी, ताक यांसारखे द्रवपदार्थ घेणे
वाढती उष्णता ही केवळ अस्वस्थता नसून हृदयासाठी धोकादायक ठरत आहे. उष्णतेमुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी हृदयाची गती वाढते, रक्तवाहिन्या विस्तारतात व डिहायड्रेशन होऊन रक्त घट्ट होते. यामुळे हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या उन्हापासून दूर राहणे व वृद्ध व हृदयविकाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.- डॉ. सचिन जायभाये, फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ