नेवाळी : शुभम साळुंके
नवी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून 14 गावात आरोग्य केंद्राची उभारणी केली होती. या गावच्या आत-बाहेरच्या नाट्यात रुग्णालयाच्या वास्तूचे रूपांतर भूत बंगल्यात झाले आहे. आरोग्य केंद्राच्या वास्तूला भयाण स्वरुप प्राप्त झाले आहे.
1996 साली जनतेच्या सेवेत आलेली आरोग्य केंद्राची वास्तू धोकादायक स्थितीत उभी आहे. त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी शहराची वाट धरावी लागत आहे. मात्र 14 गावांच्या आरोग्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा दिसत नसल्याने जनतेचे मात्र हाल सुरू झाले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेल्या तत्कालीन 14 गावांमध्ये आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. नावाळी आरोग्य केंद्र वैद्यकीय सेवेच मुख्य केंद्र झाले होते. मात्र कालांतराने 14 गाव नवी मुंबई मनपा क्षेत्रातून वगळल्यानंतर वैद्यकीय सेवा पालिकेने बंद केली होती. बंद झालेली सेवा आज पर्यंत बंद राहिली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने रुग्णालयाच्या परिसरात कंटेनरमध्ये वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली सेवा बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन दरबारी 14 गावांसाठी आवश्यक असणारी आरोग्य सेवा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू होत नसल्याने नागरिकांचे वैद्यकीय सेवेसाठी हाल होत आहेत. नागरिकांच्या व्यथा लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणांना कधी समजणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्प दंश, श्वान दंश झाल्यानंतर तत्काळ उपचाराची आवश्यकता असते. त्यावेळी या गावांमधील नागरिकांना निळजे, मुंबई , डोंबिवली, ठाणे अश्या शहरांमध्ये धावपळ करावी लागते. एकीकडे शासनाकडून आरोग्यसेवेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र दुसरीकडे 14 गावांच्या आरोग्य सेवेकडे का? गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे 14 गावांची आरोग्य सेवा मजबूत होणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 14 गावांचा नवी मुंबई मनपा क्षेत्रात प्रवेशाची लक्षवेधी तत्कालीन आ. राजू पाटील यांनी उपस्थित केली होती. यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 गाव नवी मुंबई मनपा क्षेत्रात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती.
14 गावात आरोग्याचा प्रश्न खूप बिकट आहे. नागरिकांना एक्सरे, रक्त तपासणीसाठी पनवेल, डोंबिवली, कौसा मुंब्रा या ठिकाणी जावे लागते. सद्यस्थितीत 14 गावात दोन खासगी रुग्णालय आहेत. परंतु तिथे एक्सरे रक्त तपासणीची सुविधा नाही तिथे बाहेरून लोक तपासणीसाठी बोलवली जातात. या खेळामुळे रुग्णाचा अधिक वेळ जात आहे. त्यात तपासणी दर पण दुप्पट असतो. या 14 गावात अनेक सरपंच होऊन गेले पण कुणीही आरोग्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत ! प्रत्येक वेळेस फक्त आश्वासनेच भेटली आहेत.- जीवन वालीलकर, ग्रामस्थ, नेवाळी, ठाणे
14 गावातील परिस्थिती बिकट आहे. गावात रुग्णालय नाही, सफाई कर्मचारी नाही, नीट पाणी आणि रस्ते सुद्धा, पावसाळ्यात डास वाढतात आणि आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजू शकतात. त्यामुळे पहिले रुग्णालय होणे गरजेचे आहे. आज गावापासून 40-50 किलोमीटर अंतरावर रुग्णालय आहेत. या 14 गावांना कोणी वाली नाही का?शिवाजी पाटील, ग्रामस्थ, नेवाळी, ठाणे
14 गावांसाठी नुकतीच अत्याधुनिक रुग्णालयाची मागणी केली आहे. लवकरच मागणी पूर्ण होईल 14 गावांसाठी हक्काचे रुग्णालय तयार होईल.राजेश मोरे, आमदार