ठाणे

मराठीचा स्वाभिमान बाळगा, तिचा अंगिकार करा... : प्रल्हाद म्हात्रे

केडीएमटीचे माजी सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

पर्याय सापडल्यावर माणसाचा स्वभाव गुणधर्म बदलतो. पूर्वी जगण्यासाठी नदीचा उपयोग करायचा. पण नंतर त्याला विहिरीचा पर्याय सापडला. विहिरीनंतर त्याला धरणाचा पर्याय सापडला आणि माणूस नळाद्वारे पाणी पिऊ लागला. जेव्हा जेव्हा एखादा नवीन पर्याय सापडतो तेव्हा तेव्हा तो जुन्या पर्यायांकडे अक्षम्य दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडून देतो अर्थात प्रदूषित करतो. म्हणजेच गरज सरो आणि वैद्य मरो. आपल्याला वैद्याची गरज परत केव्हा ना केव्हा भासणार आहे याचा माणसाला रितसर विसर पडतो. तसेच मातृभाषेचेही आहे. इतर भाषांचा पर्याय सापडला त्याने मराठी भाषेकडे दुर्लक्ष केले आणि तिला अडगळीत ढकलून दिले. पण जसजसा तो आपल्या नैसर्गिक स्रोताचा त्याग करतोय तसतसा तो अधोगतीकडे वाटचाल करतो अशी मराठी भाषेची परिस्थिती असल्याचे सांगून मराठीचा स्वाभिमान बाळगा आणि तिचा अंगिकार करा, असे आवाहन केडीएमटीचे माजी सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केले.

डोंबिवलीतील रेल चाईल्ड संस्था संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेने संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना केडीएमटीचे माजी सदस्य प्रल्हाद म्हात्रे बोलत होते.

मातृभाषा मराठीतून शालेय शिक्षण घेणे चांगले असल्याचे पटल्याने पाल्यांचे मराठी माध्यमाच्या वर्गात प्रवेश घेतल्याने शाळेची पटसंख्या वाढली व अभिजात, समृद्ध, संपन्न अशा मराठी ज्ञानभाषेतून शिकण्याची सुवर्णसंधी पाल्यास दिल्याबद्दल मराठी गौरव सन्मानपत्र देऊन पालकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील मराठी काका अनिल गोरे, डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त बाळकृष्ण वाघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप गवळी, संस्था कार्यवाह झरकर, कोषाध्यक्ष पटवर्धन, निमंत्रित सदस्य मंगेश देशपांडे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सदस्य प्रल्हाद म्हात्रे, सीआरसी प्रमुख महेश्वरी, आदी मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून प्रल्हाद म्हात्रे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित पालकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रल्हाद म्हात्रे यांनी 51 हजारांचा धनादेश शाळेला मदत म्हणून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजयकुमार जोगी यांनी केले, तर सूत्रसंचालन ललिता कुलकर्णी यांनी केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे अनिल गोरे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये मराठी माध्यमातून शालेय शिक्षणाची उपयुक्तता, तसेच शैक्षणिक फायद्यांची माहिती दिली. पालकांनी सर्व परिचितांसह नातेवाईक, मित्रांना त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास प्रेरित करावे. इंग्रजी शाळेत मुलांना घालून पालक चूक करत आहेत. कारण मराठी माध्यमातील शिक्षण हे कस्तुरी मृगासारखे आहे. गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक पालकांशी संवाद साधताना म्हणाल्या की, मराठी शाळेतील विद्यार्थी जीवनामध्ये कुठेही कमी पडत नाही हा त्यांचा अनुभव आहे. मराठी शाळेतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा खरा विकास होतो. तेथेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असल्याचे मत अलका मुतालिक यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT