पावसाळ्यात ‘हँडशेक’ पण ठरतोय धोकादायक! pudhari photo
ठाणे

Monsoon hygiene tips : पावसाळ्यात ‘हँडशेक’ पण ठरतोय धोकादायक!

डिनो आणि एन्टरो व्हायरसमुळे डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने वाढतोय

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला हे आजार सर्रास पाहायला मिळतातच, मात्र यंदा एक वेगळा आणि डोळ्यांना त्रासदायक संसर्ग डोके वर काढतोय - तो म्हणजे डोळ्यांतील विषाणूजन्य इन्फेक्शन. आरोग्य विभागानुसार ‘एन्टरो’ आणि ‘डिनो व्हायरस’ या दोन विषाणूंमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर डोळ्यांच्या त्रासाला सामोरे जात आहेत.

‘एंटेरो आणि डिनो’ व्हायरसचा प्रसार थेट हातांवरून होतो. म्हणजेच, संक्रमित व्यक्तीशी ‘हँडशेक’ केल्यास किंवा अशा व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, मोबाईल, दाराची कडी किंवा इतर वस्तूंना हात लावल्यानंतर डोळ्यांना हात लावल्यास विषाणू सहज डोळ्यांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो. ही साखळी तोडण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे, रुमाल शेअर न करणे आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श न करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

हात स्वच्छ न धुता डोळ्यांना हात लावणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, एकाच घरात एकाच टॉवेलचा वापर, डोळ्यांना सतत चोळणे ही या संसर्गाची प्रमुख कारणं आहेत. पावसात वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे डोळ्यांच्या श्लेष्मल झिल्लीवर विषाणूचा आघात अधिक सहज होतो. त्यामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्यांना याचा धोका अधिक असतो.

अशी घ्या काळजी

डोळ्यांत खाज, लाल होत असल्यास ती दुर्लक्षित न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. चुकीच्या घरगुती उपायांनी डोळ्यांची स्थिती अधिक बिघडू शकते. काहीजण इंटरनेटवर वाचून डोळ्यांत हळद, बर्फ, पाण्याचे फवारे वापरत असल्याचे आढळून आले आहे - पण हे उपाय आरोग्यास घातक ठरू शकतात. कोणतेही ड्रॉप्स, थेंब किंवा अँटीबायोटिक्स नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नयेत. संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, हात धुण्याची सवय आणि स्वतःच्या वस्तू इतरांशी शेअर न करणे ही खबरदारी आवश्यक आहे.

‘हँडशेक’सारखी साधी कृतीही ‘डिनो’ आणि एंटेरो व्हायरस विषाणूचा मार्ग बनत असल्यामुळे लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पावसाळ्यात डोळ्यांपासून सुरुवात होणार्‍या या संसर्गाच्या साखळीला तोडण्यासाठी स्वच्छता, सजगता आणि त्वरित उपचार हाच एकमेव उपाय आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत.
डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT