कसारा : लाखो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या खाजगी बसवर सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई गुरूवारी (१६) मुंबई-आग्रा महामार्गावरील खर्डी जवळील गोलभण फाट्याजवळ करण्यात आली. बसचालक जोगेंद्रप्रसाद शाह याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, इंदोर येथून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी बसमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुत्राकडून मिळाली होती. त्यानुसार खर्डी जवळील गोलभण फाट्याजवळ पथकाने खाजगी बसला थांबवत तपासणी केली. या बसमध्ये गुटख्याच्या १९ गोण्या आढळून आल्या. याप्रकरणी बसचालक जोगेंद्रप्रसाद शाह याला ताब्यात घेतले असून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी खाजगी बस, ९ लाख ३७ हजाराचा गुटखा, मोबाईल असा एकूण ३९ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल यावेळी जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, सुनील कदम, पोलीस हवालदार प्रकाश साहिल, संतोष सुर्वे, गोविंद कोळी व पोलीस शिपाई स्वप्नील बोडके यांनी केली.