ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकार्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा कठोर शब्दात सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवार (दि.9) रोजी दिल्या.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांशी याबाबत चर्चा केली. मंत्री पाटील यांनी पडघा, वाशिंद, आसनगाव, चेरपोली, खर्डी येथे भेट दिली.
या दौर्यादरम्यान मंत्री महोदयांसमवेत आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा परिषद जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रमोद काळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तन्मय कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील म्हणाले की, नुकतीच मंत्रालयात ठाणे आणि शहापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा संबंधित काही योजना आहेत, त्या योजनांची पाहणी करणे, अपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही आणि अंमलबजावणी गतिमान करणे, त्यासोबतच बंद असलेली कामे बंद का आहेत, त्यासंबंधी अडचणी काय आहेत, त्या जाणून घेण्यासाठी या दौर्याचे नियोजन करण्यात आले. या दौर्यात स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधीही सोबत असणार आहेत. आपल्या देशाचा हर घर जल... हर घर नल हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो पूर्णत्वास येण्याकरिता हा दौरा आहे. त्यानुषंगाने या दौर्यात माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न असून ठाणे जिल्ह्यातील धरणांबाबत सांगताना पाटील पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकरिता पाठपुरावा करीत आहेत. धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न असणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 1 हजार 47 कामे सुरू आहेत. त्यापैकी 720 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण असून 327 कामे, घरगुती नळजोडणीची आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील 7 कामे अद्याप सुरू झाली नाहीत. याबाबत वनविभागाचे वाईल्डलाईफची परवानगीची चार कामे प्रलंबित आहेत. तर दोन कामे जागेअंतर्गत वादामुळे प्रलंबित तर एका ठिकाणी रस्ता नसल्याने तेथे जाण्याची सुविधा नसल्याने प्रलंबित आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली परंतु सध्या बंद असलेली 51 कामे आहेत. त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
शहापूर/भिवंडी : शहापूर तालुक्याची पाणी टंचाई निवारणासाठी भावली पाणी योजना यशस्वी करणार, त्यात कोणीही कितीही अडथळा आणला तरी योजना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासित केले. शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पोहोचून तेथील महिलांची पाण्यासाठी होणारी धडपड राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नजरेने पाहिले आहे. त्यामुळे भावली पाणी योजना ही एकनाथ शिंदे यांचे प्राण असून त्यासाठी योजनेला पूर्णत्वाकडे नेणारच. गुरुवारी शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन संदर्भात ग्रामपंचायत भेटी दौर्यावर असताना गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना सांगितले. भावली पाणी योजनेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील 298 गावपाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी कामास सुरुवात केली आहे.
शहापूर तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेल्या हर घर जल हर घर नल ही योजना पूर्ण करण्याकरिता हे सरकार कटीबद्ध आहे. या कामात जो कुचराई करेल, त्याला जागे वर शिक्षा देणार आणि जे काम थांबले आहे ते पूर्ण करण्यासाठी आता आम्ही मंत्रालयातून बाहेर पडलो असल्याचे वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. दरम्यान भिवंडी तालुक्यात पाणी पुरवठा योजनांची जी कामे संथ गतीने सुरू आहेत, ती जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. जी कामे ठप्प आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.