ठाणे ः गोकुळ दहीहंडी म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या दहिहंडीमध्ये 10 थर लावणार्या गोविंदा पथकास 11 लाखांचे पारितोषिक असून नऊ थराला 5 लाख 55 हजार 555 रुपयांसह बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. 16 ऑगस्ट रोजी कॅसल मिल नाका येथील स्व. मीनाताई ठाकरे चौक येथे गोकुळ दहीहंडी उत्सवाचे आयोजन केल्याची माहिती आयोजक व माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या हंडीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह भाजपचे ज्येेष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार, कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत.
ठाण्यातील खोपटाचा राजा गोविंदा पथकाने गेल्या वर्षी आमच्या हंडीत 9 थर लावून विश्वविक्रम केला आहे. गोकुळ दहीहंडी म्हणून आमची दहीहंडी महाराष्ट्रात प्रसिध्द झाल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले. मागील वर्षी 200 गोविंदा पथकांनी या उत्सवाला हजेरी लावली. यंदा 250 पथके सहभागी होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेविका नंदा पाटील, भाजपचे शहर सरचिटणीस तथा शारदा संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
यंदा गोविंदा पथकासाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सुमारे 12 हजार गोविंदानी या अन्नछत्राचा लाभ घेतला. तर या वर्षी 15 ते 20 हजार गोविंदा येण्याची शक्यता असल्याने तशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. कोणाला दुखापत होऊ नये यासाठी आम्ही सर्वोतोपारी काळजी घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
अशी असणार पारितोषिके
प्रथम 10 थर लावणार्या पुरुष गोविंदा पथकास 11 लाख 11 हजार 111 रुपये व चषक, प्रथम 9 थर लावणार्या पथकास 5 लाख 55 हजार 555 रुपये व चषक, नंतरचे नऊ थर लावणार्या पथकास 2 लाख 22 हजार 222 रुपये व चषक, 8 थरासाठी 51,000 रुपये व चषक, 7 थरासाठी 15,000 रुपये व चषक, 6 थरासाठी 9,000 रुपये व चषक, 5 थरासाठी 5,000 रुपये व चषक, 4 थरासाठी 5,000 रुपये व चषक असे बक्षीस असणार आहे. प्रथम 7 थर लावणार्या महिला गोविंदा पथकास 1 लाख 51 हजार 111 रुपये व चषक, नंतरचे 7 थर लावणार्या पथकास 51 हजार रुपये व चषक, 6 थर लावणार्या पथकास 25 हजार रुपये व चषक, 5 थर लावणार्या पथकास 10 हजार रुपये व चषक, 4 थर लावणार्या पथकास 5 हजार रुपये व चषक असे बक्षिसाचे स्वरूप असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली.