ठाणे : राज्यातील औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी उद्योग विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. कोल्हापूर शहराचा समावेश करून ग्लोबल कॉम्पिटिटिव्हिटी सेंटर स्थापण्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांचा स्वतंत्र इकॉनॉमिक झोन म्हणून विकास करण्याचे नियोजन सुरू आहे. गडहिंग्लज, नवापूर, नांदगाव आणि वाशिम येथे नव्या एमआयडीसी उभारण्याच्या प्रस्तावांचाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आढावा घेतला. या माध्यमातून औद्योगिक गुंतवणूक, उद्योगविस्तार आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे.
उद्योग व मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात विविध जिल्ह्यांतील औद्योगिक विकासासंदर्भात बैठका पार पडल्या. यामध्ये नवीन औद्योगिक क्षेत्रांची स्थापना, भूसंपादन, पायाभूत सुविधा आणि स्थानिकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. औद्योगिक विकास करताना भूसंपादनाबाबत स्थानिकांच्या हरकती, पर्यायी रस्ते, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. नव्या एमआयडीसींच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार, उद्योजकांना गुंतवणुकीच्या संधी आणि संबंधित भागांना औद्योगिक ओळख मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची भूमिका सामंत यांनी मांडली.