ठाणे

Thane News | नियोजनाविनाच घोडबंदर सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राष्ट्रीय महामार्ग असलेल्या घोडबंदरवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सेवा रस्ते मुख्य हायवेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रकल्प एमएमआरडीएच्या वतीने नियोजित करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाला नागरिकांकडून विरोध करण्यात येत असून दुसरीकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता या प्रकल्पाचा कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. सेवा रस्त्यांवर असलेली मोठी गृहसंकुले, हॉस्पिटल यासाठी या प्रकल्पामुळे मोठ्या अडचणी निर्माण होणार असून सेवा रस्त्यांवर असलेल्या सर्वप्रकारच्या भूमिगत वाहिन्या देखील स्थलांतरित करण्यात आलेल्या नसल्याने हा प्रकल्पच आता वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

घोडबंदर रोडवरील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 9-9 मीटर सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव आहे. सेवा रस्त्यांचा वापर फक्त रस्त्याजवळील दुकानदार व काही खाजगी गाड्या तसेच टेम्पो, ट्रक, ऑटो रिक्क्षा पार्किंगसाठी केला जातो. त्यामुळे स्थानिक वाहनचालक सर्व्हिस रोडचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करतात. तसेच सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या गटारावरील 5 ते 6 फुट फुटपाथचा वापर पादचार्‍यांना होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जर या सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात आल्यानंतर घोडबंदरची वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील काही अंशी सुटणार आहे. सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. सरनाईकांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून या प्रकल्पाच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे.

घोडबंदर मार्गावरून गुजरात आणि जेएनपीटी बंदराच्या दिशेने दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही वाहने घोडबंदर मार्गावरूनच वाहतूक करतात. या मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. घोडबंदरवासियांनी या प्रकल्पास विरोध करत त्यास स्थगिती देण्याची मागणी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात कावेसर येथील ललानी रेसीडेन्सी संकुलातील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. यापूर्वी उबाठाचे ओवळा-माजिवडा विधान सभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला होता. त्यापाठोपाठ आता नागरिकांनी हा प्रकल्प नकोच असा सुर लावला आहे. त्यामुळे हा प्रकल्प वादात साडण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही नियोजनाविनाच हा प्रकल्प राबविला जात आहे.

सेवा रस्त्यांवर यापुर्वी विद्युत, मल, जल आणि महानगर गॅसच्या वाहिन्या गेल्या आहेत. सेवा रस्त्यावर गटारांची बांधणी करताना या वाहिन्या स्थलांतरीत करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता त्यावर गटारांची उभारणी केली आहे. यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याबरोबर जल वाहीनीत सांडपाणी जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच मुख्य आणि सेवा रस्ता जोडल्यास अवजड वाहनांना प्रवास वेगाने होईल आणि यामुळे संकुलातून बाहेर पडताना अपघात होतील. त्यामुळे प्रकल्पास आमचा विरोध असून शासनाने या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे ललानी रेसीडेन्सी संकुलाचे अध्यक्ष रामास्वामी यांनी सांगितले. तर, सेवा रस्त्यालगत आमच्यासारखी अनेक गृहसंकुले आहेत. या संकुलाचे प्रवेशद्वार सेवा रस्त्यावर आहेत.तसेच या भागात अनेक शाळाही आहेत.शासनाच्या नियमानुसार महामार्गालगतच्या गृहसंकुलांसमोर सेवा रस्ता बंधनकारक आहे. हा नियम सरळसरळ पायदळी तुडविला जात आहे. तसेच या प्रकल्पात अनेक झाडेही बाधित होणार असून यामुळे पर्यावरणाही बिघडणार आहे.

2 हजार वृक्ष होणार बाधित

घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख या 9.30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यात मुख्य आणि सेवा रस्ते जोडले जाणार आहेत. त्यासाठी 560 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामामध्ये तब्बल 2 हजार 196 वृक्ष बाधित होणार असून त्यापैकी केवळ 549 वृक्षांचे पुर्नरोपण होणार आहे. उर्वरित 1 हजार 647 वृक्षांवर कुर्‍हाड चालविली जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प खर्‍या अर्थाने वादात सापडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT