Thane | घोडबंदरवर जोड रस्त्याचा नवा प्लॅन  Pudhari File Photo
ठाणे

Thane | घोडबंदरवर जोड रस्त्याचा नवा प्लॅन

वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रताप सरनाईक यांचा पाहणी दौरा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : घोडबंदर मार्गावर सतत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जोड रस्त्याचा नवा प्लॅन करण्यात येत आहे. या कामाचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेतला आहे. यावेळी प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा सेवा रस्ता हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा अशी मागणी पुढे आली आहे.

त्या अनुषंगाने संबंधित अधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तेथे प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी. जेणेकरून एसटी बस, शहर बस आणि रिक्षा व टॅक्सी या वाहनांखेरीज इतर वाहने या मार्गावरून येऊ नयेत, अशा प्रकारचे सूचनाफलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावेत, अशा देखील सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. या सूचनांच्या अनुषंगाने केलेले बदल 15 ऑगस्ट पर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दाखवण्यात यावेत आणि त्यांच्या अनुमतीने पुढील काम सुरू करावे, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करा. मेट्रो स्थानके व त्या अनुषंगाने इतर कामाची पाहणी मंत्री सरनाईक यांनी केली. यावेळी संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करावा, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिल्या. तसे पत्र ठाणे महापालिकेने संबंधिताना द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. ठाणे-घोडबंदर मार्ग हा वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. दरम्यान यावेळी सर्वच प्रकल्पांच्या कामाच्या आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. यावेळी ठाणे महापालिका , मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

काम वर्षअखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश

यावेळी सरनाईक म्हणाले, पाच ते सहा वर्षापूर्वी ठाणे मेट्रोचे काम सुरू झाले, तेव्हा सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता. परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की सध्याचा सेवा रस्ता हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा. जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल. त्या अनुषंगाने 600 कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. हे काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षअखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे

सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता याच्या मधोमध मेट्रोचे स्थानकाचे जिने उतरत असल्यामुळे ते भविष्यामध्ये प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील, अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या. या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी या दौर्‍याचे नियोजन केले होते. सध्या सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढलेली आहे. परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे, तेथे प्रवासी उतरण्याच्या जिन्यालगत प्रवाशांना पुरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे सरनाईक म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT