ठाणे : ठाणे महापालिकेचे ड्रेनेजचे काम सुरु असताना जेसीबीचा धक्का लागल्याने गॅसलाईनला गळती लागल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता कोपरी परिसरात घडली आहे. गॅस लाईनला गळती लागल्याने या परिसरातील ५०० पेक्षा अधिक कुटुंबीयांचा गॅस पुरवठा बंद झाला. ऐन घटस्थापनेच्या एक दिवस आधीच हा सर्व प्रकार घडल्याने नागरिकांकडून विकासकाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. तर गॅस लाईन दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून संध्याकाळी उशिरापर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महानगर गॅसच्या वतीने देण्यात आली आहे.
कोपरी परिसरातील नाखवा स्कूलच्या जवळ, काशी आई मंदिरच्या बाजूला ठाणे महापालिकेचे मे.अथर्व कंट्रक्शन यांचे मार्फत ड्रेनेज विभागाच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना १२:३४ वाजताच्या सुमारास या कामासाठी वापरण्यात आलेल्या जेसीबीचा धक्का या परिसरात असलेल्या गॅसच्या लाईनला लागला. त्यामुळे गॅसच्या लाईन मधून गळती सुरु झाली. या घटनेची माहिती कोपरी अग्निशमन दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी महानगर गॅस कर्मचारी, कोपरी पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित होते.
घटनास्थळी पोहचल्यानंतर महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी गॅस पाईपलाईनचा मुख्य वॉल्व बंद केला. तसेच गॅस पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु कारण्यात आले. मात्र या घटनेमुळे कोपरी परिसरातील सुमारे ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा दुरुस्तीचे काम होईपर्यंत बंद करण्यात ठेवण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान गॅस पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु राहणार असून त्यानंतर गॅस पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती महानगर गॅसच्या वतीने देण्यात आली आहे.