Dombivli gas shortage rumors
डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरसमाज माध्यमांवर पसरलेल्या अफवांचा मोठा फटका कल्याण-डोंबिवलीतील गॅस वितरणालाही बसला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या मेसेजेसमुळे ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे. परिणामी, एकाच वेळी हजारो ग्राहकांनी सिलिंडर बुकिंग केल्याने पुरवठा साखळीवर ताण आला असून, ग्राहकांना आता सिलिंडरसाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागत आहे.
समाज माध्यमांवर गॅस पुरवठा बंद होणार, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाल्याने कल्याण-डोंबिवलीतही गृहकांनी सावधगिरी म्हणून एकाच वेळी सिलिंडर बुक करण्यास सुरूवात केली. ज्यांच्याकडे अतिरिक्त सिलिंडरची सोय आहे, त्यांनीही तातडीने रिफिलिंगसाठी नोंदणी केली. परिणामी वितरण व्यवस्थेवर अचानक भार पडला आहे. त्यामुळे नियमित बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनाही आता ६ ते ८ दिवस वाट पहावी लागत आहे.
एकीकडे काही ग्राहकांनी भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी बाजारातून विजेवर चालणाऱ्या शेगड्या खरेदी करण्यास पसंती दिली आहे. तर दुसरीकडे शहरात उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून काही कुटुंबांनी चक्क आपल्या मूळ गावी जाण्याची तयारी केली आहे, जेणेकरून तिथे उपलब्ध असलेल्या चुलीवर स्वयंपाक करता येईल. चुलीवरच्या जेवणाची मज्जाच काही और असते. त्यामुळे अनेकांनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गावाकडे जाण्याचे प्लॅन केले आहेत.
वितरकांकडून जनजागृतीचा प्रयत्न
गॅस एजन्सी आणि डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना वारंवार सांगण्यात येत आहे की, देशात गॅसचा कोणताही तुटवडा नाही आणि पुरवठा सुरळीत आहे. मात्र, तरीही ग्राहक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून सिलिंडरचा साठा करून ठेवण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. या संदर्भात गॅस वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक केवळ अफवांमुळे पॅनिक होऊन बुकिंग करत आहेत. मागणी अचानक वाढल्याने वितरणास उशीर होत असला तरीही गॅसची टंचाई नाही.
हॉटेल्स बंद झाल्याने खवय्यांचे वांदे
तेल व गॅसचा पुरवठा सुरळीत आहे, तर मग ग्राहक गॅससाठी रांगा लाऊन का उभे आहेत ? गॅस कंपन्यांकडून सिलेंडर बूक करण्यासाठी अटी आणि शर्ती का लावल्या जात आहेत ? हाॅटेल व्यावसायिकांनी आपली हॉटेल्स का बंद ठेवली आहेत ? एकिकडे गॅसच्या नावाने ग्राहकांना निर्धास्त करायचे आणि दुसरीकडे ग्राहकांना कामधंदे सोडून दिवसभर रांगेत उभे करायचे हा सरकारचा दुतोंडीपणा असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून समाज माध्यमांवर करण्यात येत आहे.