मुरबाड शहर : किशोर गायकवाड
आधुनिक जीवनशैलीत हळूहळू हरवत चाललेली मातीची चूल आज पुन्हा ग्रामीण भागात नव्या जोमाने पेटताना दिसत असून सध्या एलपीजी गॅसच्या टंचाईने कळस गाठल्यामुळे अनेक कुटुंबांना पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळावे लागत आहे. या बदलामुळे वर्षानुवर्षे टिकून असलेली गावातील पारंपरिक कारागिरी पुन्हा एकदा जिवंत होताना दिसत असून चुली बनविणाऱ्या कारागिरांच्या जीवनातही नव्या आशेचा उजेड दिसू लागला आहे.
तालुक्यातील माल्हेड गावातील गुरुनाथ लक्ष्मण शिंदे हे अशाच पारंपरिक व्यवसायाला जपणारे युवा कारागीर आहेत. औद्योगिक क्षेत्रात नोकरी सांभाळत असतानाच ते घरातील पिढ्यानपिढ्यांच्या व्यवसायाला हातभार लावत आहेत. त्यांच्या घराच्या अंगणातच मातीच्या चुली आणि मडकी तयार करण्याचे काम सुरू असते.
पूर्वी शहरांमध्ये गॅसच्या वाढत्या वापरामुळे चुलीचा व्यवसाय हळूहळू कमी होत चालला होता. मात्र सध्याच्या गॅस टंचाईमुळे पुन्हा एकदा लोक चुलीकडे वळताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांकडून ऑर्डरही येऊ लागल्या आहेत. तरीही पावसाळ्यात हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होतो, अशी माहिती शिंदे देतात.
गॅसच्या संकटाने ग्रामीण जीवनाला जणू काही मागे वळून पाहायला भाग पाडले आहे. पण त्या मागे वळण्यामध्येच गावाच्या पारंपरिक संस्कृतीचे खरे वैभव पुन्हा उजळून निघताना दिसत आहे. चुलीची धग फक्त स्वयंपाकापुरती मर्यादित नसते; ती गावपणाची ऊब असते, मातीशी असलेल्या नात्याची साक्ष असते. आज पुन्हा एकदा त्या चुली पेटू लागल्या आहेत आणि त्याचसोबत गावच्या कारागिरांच्या आयुष्यातही आशेची नवी ज्योत पेटू लागली.
दोन खाणांची चूल 200 रुपयांपासून तर तीन खाणांची चूल 250 रुपयांपासून विक्रीसाठी तयार केली जाते. याचबरोबर मडकीदेखील 120 रुपयांपासून विक्रीसाठी ठेवली जातात. या कामामागे मोठा खर्चही असतो. चूल बनविण्यासाठी लागणारी माती सुमारे 1300 रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली दराने विकत घ्यावी लागते आणि त्या एका ट्रॉलीमधून अंदाजे 70 चुली तयार होत असल्याचे सांगितले. याशिवाय पाणी, भाताचा तूस, राखाडी माती, घोड्याची लीद अशा साहित्याचाही खर्च येतो. तर दिवसाला सुमारे 10 ते 12 चुली तयार केल्या जात असल्याचे शिंदे सांगतात.
चूल बनविण्याची प्रक्रिया अत्यंत मेहनतीची आणि कौशल्याची असते. विशेष प्रकारची चिकट व भास्कट माती खड्ड्यात टाकून पाण्यात भिजवली जाते. काही काळ भिजल्यानंतर त्या मातीची व्यवस्थित मळणी केली जाते. ही मळणी म्हणजेच कारागिरांच्या मेहनतीची कसोटी असते. माती पुरेशी लवचिक आणि मजबूत झाली की ती बाहेर काढून वळवली जाते. यानंतर पारंपरिक कारागिरीच्या अनुभवातून मातीला आकार दिला जातो. काही चुली साच्याच्या साहाय्याने तर काही पूर्णपणे हाताने घडवल्या जातात. चुलीला आकार दिल्यानंतर त्यावर गेरूने रंगरंगोटी केली जाते आणि त्या वाळल्यानंतर बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात येतात.