माणगाव : कमलाकर होवाळ
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून माणगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी वल्गना करत महामार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या महामार्गावर वडखळ ते इंदापूर दरम्यान मोठ मोठे खड्डे -पडले असून अतिवृष्टीत ते आणखीनच खड्डे जीव घेणे ठरत आहेत. गणेशोत्सवाला अवघे ६० दिवस उरले आहेत. मात्र अद्यापही महामार्ग पुर्ण झाला नाही. त्यामुळे यंदाचे वर्षीही कोकणातील गणेशभक्तांना वाहतूक कोंडी बरोबर खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे. याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
माणगाव ते इंदापूर दरम्यान तासनतास होणाऱ्या कोडींतून तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परंतु मंत्र्यांनी दिलेल्या या सूचना पाळून कोंडी फोडण्याची इच्छाशक्ती गेल्या अनेक वर्षांत प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांना दाखवता आलेली नाही. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यापासून ते रवींद्र चव्हाणांपर्यंत अनेकांनी नवनवीन डेडलाइन दिल्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पदरात कोकणातील जनतेने वेळोवेळी मतांचे दान टाकले. पण कोकणवासीयांच्या पदरात मात्र आतापर्यंत आश्वासना पलीकडे काहीच पडलेले नाही.
माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई येथे तातडीने संबंधित उच्चस्तरीय अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांसाठी सुमारे १८ कोटी तातडीने देण्यात येतील असे आश्वासन दिले. मात्र हे रस्ते पावसाळ्यात होणार नाहीत. माणगाव आणि इंदापूर बायपास बद्दल त्यांनी ठोस मार्ग काढलेला नाही. त्यामुळे गणेशभक्तांना यावर्षीही हाल अपेष्टा सोसत, खड्डे सहन करीत आणि वाहतूक कोंडीचा सामना करीत जीव मुठीत धरून गणेशोत्सवाला कोकणात जावे लागणार आहे. रायगड जिल्ह्यात नागोठणे कोलाड, रातवड,
कळमजे माणगाव, लोणेरे येथील पूलांची बांधकामे अजूनही सुरूच आहेत. पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रस्ते कमकुवत आहेत. मोऱ्यांची बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्याने चौपदरी महामार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या कोकणवासीयांच्या रखडपट्टीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाइलने अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आणि या महामार्गाची न संपणारी व्यथा पुन्हा एकदा चर्चेत आली. २०११ मध्ये पनवेल ते झाराप या ४७१ किमी महामार्गाच्या
चौपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव, निष्क्रिय प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार यामुळे गेल्या १४ वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाची 'मृत्यूचा महामार्ग' आणि 'मृत्यूचा सापळा' अशी ओळख निर्माण झाली आहे.
देशभर रस्त्यांचे जाळे विणणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या संदर्भात आपण कमी पडल्याचे मान्य करावे लागले. पाच तासांत ७५ किमी रस्त्याची निर्मिती, ६२५ किमीच्या समृद्धी महामार्गाचे निर्माण, ग्रीनफील्ड, शक्तिपीठ अशा अनेकानेक महामार्गांच्या केंद्र आणि राज्य सरकारकडून होणाऱ्या घोषणा सहनशीलता संपलेला कोकणी माणूस हतबलपणे ऐकत आहे. गेली १४ वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची डेडलाइन कधी संपणार, हा देखील एक प्रश्न आहे. गेल्या सहा वर्षांत राज्य सरकारने डेडलाइनच्या तारखा अनेकदा बदलल्या आहेत. ड. ओवेस पेचकर यांनी महामार्गाच्या रखडपट्टी बाबत केलेल्या जनहित याचिकांच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला वेळोवेळी ताशेरे ओढत खडे बोल सुनावले आहेत. तरीही कोणी दखल घेत नाही हे दुर्दैव आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात लेखी हमी देऊनही काम पूर्ण न केल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला ५ जुलै २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. माणगाव आणि इंदापूरच्या बाजारपेठांमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देण्यात आलेल्या बायपासची कामेही रखडली आहेत. त्यामुळे सुट्टीच्या काळात तब्बल तीन ते पाच तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. आता रखडलेल्या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे शिवधनुष्य उपमुख्यंमत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी उचलले आहे. त्याच्या कार्यकुशलतेतून गणेशोत्सवापर्यंत हा महामार्ग पूर्ण व्हावा. नवनव्या डेडलाइनची सवय झालेल्या कोकणवासीयांवर आणखी एका डेडलाइनची वेळ येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.