डोंबिवली (ठाणे) : युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या बारा किल्ल्यांच्या सजावटीतून शिवरायांना अनोखी मानवंदना देण्याचा प्रयत्न डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केला आहे. ही सारी किमया प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी साधली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून इतिहासाच्या पाऊलखुणा आगळ्यावेगळ्या कलाकृतीतून दृष्टिक्षेपात आल्या आहेत. हा नजरा पाहण्यासाठी गणेशभक्तांची रीघ लागलेली दिसून येते.
अभिनव संकल्पनेतून दरवर्षी विविध संस्कृतींचे दर्शन घडवणाऱ्या सजावटींसाठी प्रसिद्ध असकेले डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ७६ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. पूर्वाश्रमीचे टिळकनगरवासीय ज्येष्ठ कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी सलग २५ व्या वर्षी भव्य आणि नेत्रदीपक सजावट साकारली आहे. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासह ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या लष्करी भूदृश्यांची ओळख आणि माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने यंदाच्या वर्षी १२ किल्ल्यांचे दर्शन घडेल अशी सजावट संकल्पना मंडळाने ठरवली. त्यानुसार संजय धबडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या चार दिवसांत ही भव्य सजावट साकारली.
मंडपात प्रवेश करतानाच एखाद्या दगडी किल्ल्यात प्रवेश केल्याचा आभास निर्माण होतो. किल्ल्याच्या १२ दरवाज्यातून युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले १२ किल्ले गणेशभक्तांना दिसतील अशा पद्धतीने सजावट संकल्पना साकारण्यात आली आहे. पक्ष्यांची किलबिल आणि सुमधुर आवाजातील संगीतामुळे मंडपातील वातावरण अतिशय प्रसन्न झाले आहे. हिरोजी इंदुलकर यांचा या किल्ल्यांच्या बांधकामांमध्ये मोठा वाटा होता. त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांनी रायगडावरील विविध वास्तूंच्या केलेल्या निर्मितीबद्दल महाराजांनी त्यांचे नाव रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या पायऱ्यांवर कोरण्याची अनुमती दिली. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर, अशाप्रकारे त्यांचे नाव कोरण्यात आले. मंडळाने यंदाच्या सजावटीला अनुसरून या शिलालेखाची प्रतिमा उत्सवाच्या निमंत्रणपत्रिकेच्या मुखपृष्ठावर घेऊन हिरोजी इंदुलकर यांना देखील मानवंदना दिली आहे.