ठाणे : ठाण्यातील गणेश मूर्ती आणि मखरांची भुरळ ही ऑस्ट्रेलियातील गणेश भक्तांना देखील पडली आहे. त्यामुळे गणेश मूर्ती आणि आकर्षक मखर थेट ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आले आहेत. तर यावर्षी ऑपरेशन सिंदर या संकल्पनेवर आधारित मखरांची आरास देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षीही पर्यावरणपूर्वक संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
ठाण्यातील काही कलाकृतींच्या वतीने यावर्षीही वेगळ्या धाटणीचे मखर व मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक मखराला परदेशात उत्तम मागणी असून ऑस्ट्रेलियाचा राजा यांच्यासाठी भव्य दिव्य मकर बनवून ऑस्ट्रेलियाच्या दिशेने जूनमध्येच रवाना केले आहे. दरवर्षी या मंडळाचा १३ फूट गणपती असतो. या अनुषंगाने यंदाही त्यांनी १७ फूट उंचीचा गणपती तयार केला आहे. या अनुषंगाने मॉड्यूलर पद्धतीने हे मखर कंटेनरमधून पाठवले असून ऑस्ट्रेलियातील मेलबर्न सिडनी आदी चार शहरांत गणेशोत्सवात हे मखर वापरून गणेशोत्सव साजरा केला जात असल्याचे सिद्धेश आर्ट अँड क्रिएशनचे संतोष रेडकर यांनी सांगितले. गणेशोत्सव हा सण भारतासह साता समुद्रापारही साजरा केला जातो. बहुतांश परदेशात भारतातून मखर आणि गणेश मूर्ती मागणीनुसार पाठविण्यात येतात. गणेशोत्सवातील हे इको फ्रेंडली मखर देश तसेच महाराष्ट्रात व परदेशी ग्राहकांना ऑनलाइनही उपलब्ध केले जातात. या मखरांची किंमत १०० ते पंधरा हजारापर्यंत असते.
ठाण्यातील घंटाळी मैदानजवळ पर्यावरण पूरक, सुंदर, आकर्षक मखर नागरिकांसाठी उपलब्ध केले आहेत. यामध्ये सरस्वती बैठक, जय मल्हार मंदिर, जेजुरी गड, कसम सिंदूर की, मर्कट आर्ट कलर, बुद्धीदंत बैठक, शाही बैठक असे अनेक सुबक व देखणे मखर उपलब्ध आहेत. येथे लहान-मोठ्या आकाराचे मखर उपलब्ध असून त्यांची किंमत २ हजारापासून १५ हजारांपर्यंत आहे. मूषक, मोदकसह मुषकराज, स्टिकर्स अशा वस्तू सजावटीस उपलब्ध करून दिल्या आहेत. अशी माहिती मखर विक्रेते संतोष रेडकर यांनी दिली.
महाराष्ट्रात जळगाव येथील अंध कलाकार या मखरांसाठी गाठी बांधण्याचे काम करतात. ही वैशिष्ट्यपूर्ण गाठ लोकांच्या पसंतीस पडत असून त्याचा वापर या मखरात केला जातो. ठाणे बाजारपेठेत विविध आकाराचे मखर, सजावटीचे साहित्य, पर्यावरण पूरक फुलांच्या माळा, मूषक राज, मोदक आदी साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केलेली आहे. यात ज्वलंत विषय असलेला मिशन सिंदूर या संकल्पनेवर आधारित देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.