एस. टी. महामंडळ  ST File Photo
ठाणे

गणेशोत्सव 2024 | चाकरमान्यांना वाहतूककोंडीतून सोडव रे बाप्पा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : गणपती बाप्पाच्या ओढीनं कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना आणि नियोजित वेळेत गावांला पोहचवण्यासाठी आहे त्या अवस्थेतील रस्त्यांतून मार्ग काढत प्रवास करणार्‍या एस. टी. महामंडळाला वाहतूक कोंडीची धास्ती आहे. दरवर्षी पेक्षा यंदा ठाणे जिल्ह्यातून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनी लालपरीला पसंती दिली आहे. गावाकडे जाणार्‍या चाकरमान्यांनी यंदाही एकीने गावाला जाण्यासाठी ग्रुप बुकींगला पसंती दिली आहे. एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने कोकणात जाण्यासाठी सुमारे 2,481 लालपरी धावणार आहेत. गेल्यावर्षी पेक्षा यंदा 524 जादा बसेस ठाण्यातून सुटणार आहेत.

रेल्वेची गर्दी, खासगी बसद्वारे होणारी लूट आणि सुरक्षित व आरामदायी प्रवास यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा ओढा लाल परीकडे वाढतो आहे. त्यातच गेल्या वर्षांपासून महिलांना एस. टी. प्रवासात मिळालेली 50 टक्के सवलत, 65 वर्षांवरील ज्येष्ठांना तिकिटात 50 टक्क सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास यामुळे गणेशोत्सवाला एस. टी. ची मागणी वाढली आहे.

यात ठाणे विभागातून कोकणच्या वाटेवर यंदा सुमारे 2,481 बसेस धावणार आहे. ठाणे विभागाच्या बसेस व या जादा वाहतूकीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून अतिरिक्त बसेस मागवल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी जादा बस उपलब्ध होणार आहेत.

वाहतूक कोंडीचा धसका

गणेशोत्सवाला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना रायगड जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर, नागोठणे येथील खराब रस्त्याचा सामना करावा लागतो. याशिवाय गणपतीच्या काळातील रस्त्यांवर वाहनांची वाढती वर्दळ यामुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे कोकणात जाणार्‍या प्रवाशांना इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी उशीर होतोच, पण परतीच्या प्रवासासाठी एस. टी. ला ही उशीर होतो. या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणच्या वाटेवर वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी ठाणे, रायगड जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर पुरेसे वाहतूक पोलीस तैनात करावेत. अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात यावी, किंवा काही काळ थांबवावी, अशा सूचना केल्या आहेत.

2,481 पैकी 2064 बसेस ग्रुप बुकींगने तर 392 बसेस संगणकीय आरक्षित आहेत.

जादा बसेसची कुमक मागवली

गणेशोत्सवातील जादा वाहतूकीसाठी एस.टी. महामंडळाने धुळे, जळगाव, नाशिक येथून जादा बसेसची कुमक मागवली आहे. या बसेसना ठाणे, कल्याण येथे प्रवास करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, या वाहतूक कोंडीचा परिणाम एस. टी. च्या नियोजित वेळापत्रकावर होत असल्याने एस. टी. महामंडळाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते, त्यामुळे खान्देश, उत्तर महाराष्ट्रातून येणार्‍या बसेसना शहापूर, बोरिवलीच्या भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, याची दक्षता वाहतूक विभाग व जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी महामंडळाची मागणी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT