भाईंदर : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन येत्या 15 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे आ. नरेंद्र मेहता यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे भाजपकडे स्वबळावर लढण्याची ताकद असल्याचे सांगून एकप्रकारे महायुतीला पूर्णविराम दिल्याचे दिसून आले.
येत्या 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेदरम्यान वनमंत्री तथा ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या दरबाराचे आयोजन मीरारोडच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात करण्यात आले आहे. याअनुषंगाने मेहता यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन मीरारोड येथील जनसंपर्क कार्यालयात केले होते. त्यात मेहता यांनी आगामी पालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याची ताकद ठेवतो, असे विधान करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे एकला चलो रे चा नारा दिला आहे. मात्र या निवडणुकीत भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी (एपी) सोबत महायुती करायची कि नाही, त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, अशी पुष्टी देखील मेहता यांनी जोडली.
यामुळे आगामी पालिका निवडणुकीत सेना-भाजपची युती होईल कि नाही यावर संभ्रम निर्माण झाला आहे. गणेश नाईक यांना मानणारा मोठा वर्ग मिरा-भाईंदरमध्ये असल्याने त्यांनी याठिकाणी जनता दरबाराचे आयोजन केले असून त्यांनीच जनता दरबाराची परंपरा 20 वर्षांपूर्वी सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना सांगितले असता त्यांनी त्यात काहीही वाईट नसल्याचे स्पष्ट केले. भाजपवाले सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कामानिमित्त जात असतात, त्यामुळे सेनेची लोकं नाईक यांच्या जनता दरबारात आपले प्रश्न सोडविण्यासाठी आल्यास त्यात काहीही वावगे ठरणार नसल्याचे म्हटले.