गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काँक्रीटचा प्रयोग करा  pudhari photo
ठाणे

Gaimukh Ghat road repair : गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काँक्रीटचा प्रयोग करा

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : काजू पाडा, चेना गाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी, रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेने येणार्‍या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यावर खडी टाकून, डांबराने ग्राऊटींग केल्यावरही हा रस्ता वारंवार उखडला जात आहे. त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावते. वाहने उलट्या दिशेने येऊ लागतात. गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई-अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो. तसेच, मिरारोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली.

त्यावर, या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्याने तेथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही. मात्र, वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली. त्यासंदर्भात, पावसाळा असल्याने खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी केली.

रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा प्रयोग मीरा-भाईंदर महापालिकेने तत्काळ करून पाहावा. हे काँक्रिट कमीत कमी वेळात एकजीव होते. त्यामुळे रस्ता बंद न करता दुरुस्ती करणे शक्य होते. नागरिकांना घाट रस्त्याच्या स्थितीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर घाट परिसर लगेच त्याच पद्धतीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. उपलब्ध सर्व यंत्रणेचा वापर करून स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून चार तासांच्या अवधीत एखाद्या मार्गिकेवरील पट्ट्यात हा प्रयोग करावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उपायुक्त दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मिरा-भाईंदर महापालिका, एमएमआरडीए, वन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रस्त्याची दुरुस्ती तत्काळ पूर्ण करावी

याच बैठकीत, घोडबंदर रस्त्यावरील सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता यांच्या एकत्रीकरणाचे काम पावसाळ्यामुळे थांबलेले आहे. काही ठिकाणी एकत्रीकरण झाले असले तरी मूळ रस्ता आणि नवीन रस्ता यांच्यात काही ठिकाणी अंतर पडले आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदर रस्त्याची एमएमआरडीएने लगेच पाहणी करून आवश्यक तेथे रस्ता एकसमान करावा आणि दुरुस्ती करावी. त्याचबरोबर, सार्वजनिक बांधकाम विभागाने कासारवडवली सिग्नल, ओवळा सिग्नल, कापूरबावडी उड्डाणपूल येथील रस्त्याची दुरुस्ती तत्काळ पूर्ण करावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT