गडकरी रंगायतनचा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकला आता 17 चा वायदा  pudhari photo
ठाणे

Gadkari Rangayatan reopening: ठाण्यातील गडकरी रंगायतन कधी सुरू होणार? प्रशांत दामलेंसमोरच अधिकाऱ्यांनी तारीख जाहीर केली

ज्येष्ठ कलाकार आणि नाट्यनिर्मात्यांनी केली नाट्यगृहाची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Thane Gadkari Natyagruha Reopening Date

ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह सुरु करण्याविषयी तारीख पे तारीख देणार्‍या पालिका प्रशासनाने आता 17 ऑगस्ट ही नवीन तारीख जाहीर केली आहे. यापूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर 15 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता हा मुहूर्त देखील हुकला आहे.

बुधवारी या नूतनीकरनाच्या कामाची पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह ज्येष्ठ कलाकार आणि नाट्यनिर्मात्यांनी पाहणी केली. यावेळी तीन रिझर्व्ह रांगाबाबत त्यांनी आक्षेप घेतला. आणि यात बदल सुचविले.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हांडे, निर्माते दिलीप जाधव, निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यकर्मी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतनची पाहणी केली.

त्यावेळी, उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.गडकरी रंगायतनमध्ये रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, यांच्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली.

तीन राखीव रांगांना कलाकारांचा विरोध

गडकरी रंगायतनच्या वास्तूचे नवीन रूप पाहून लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि व्यवस्थपाकांनी आनंद व्यक्त केला. परंतू त्या सोबत या सर्व मान्यवरांनी ठाणे महापालिकेला गडकरी रंगायतनच्या नव्या रूपात आणखी भर घालण्यासाठी काही सूचनाही केल्या. रंगायतनच्या प्रेक्षागृहात ठेवण्यात आलेल्या पहिल्या तीन व्हीआयपी रांगांचा उल्लेख काढावा, तसेच या रांगांमधील खुर्च्यांची उंची इतर रांगांना समकक्ष ठेवण्यात यावी. नाट्यगृहाच्या आवारात ज्येष्ठ नागरिक तसेच प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असावी. आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.

गडकरी रंगायतनच्या कामाची आज पुन्हा पाहणी केली. काम चांगले झाले आहे. ध्वनी आणि प्रकाश योजनाही व्यवस्थित आहे. रंगपट आणि बॅक स्टेजला काही सुधारणा सुचवल्या आहेत. आता लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची संधी मिळू देत.
प्रशांत दामले, अध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद
प्रकाशयोजनेबद्दल काही सूचना आजच्या पाहणीत केल्या आहेत. नुतनीकरणाचे उर्वरीत काम चांगले झाले आहे. वास्तू आकर्षक झाली आहे. त्यात आता प्रयोगाचे रंग लवकर भरले जावेत.
अशोक हांडे, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक
पहिल्या पाहणीच्या वेळी केलेल्या सूचनांची व्यवस्थित अमलबजावणी झाल्याचे पाहून चांगले वाटले. नुतनीकरणाचे काम योग्य पद्धतीने झाले आहे. ज्या काही एक-दोन गोष्टी होत्या त्याही आजच्या पाहणीनंतर पूर्ण करण्याचा शब्द महापालिकेने दिला आहे.
प्रसाद कांबळी, निर्माते
गडकरी रंगायतनला आज भेट दिल्यावर आनंद वाटला. नुतनीकरणासाठी थोडा वेळ लागला असला तरी ते काम चांगले झाले आहे. रंगमंचापासून ते आसनव्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या जुळून आल्या आहेत.
मंगेश देसाई, अभिनेते आणि निर्माते
ठाणे शहराची ओळख असलेली ही वास्तू चांगली होण्यासाठी उत्तम काम झाले आहे. सूचनांची अमलबजावणी झालेली आहे. या वास्तूचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वजणांचे मनापासून कौतुक आहे.
विजू माने, दिग्दर्शक आणि निर्माते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT