ठाणे : जुन्या ठाणेकरांसाठी करमणूकीचे हक्काचे ठिकाण असलेल्या अंर्तबाह्य कात टाकणार्या गडकरी रंगायतनच्या चकाचक रूप ठाणेकरांना साद घालणारे असले तरी या नव्या अंतरंगांत गडकरी नाट्यगृहांतील खुर्चांच्या आसनक्षमतेत घट झाली आहे.
प्रेक्षागृहात पहिल्या तीन रांगा या अतिमहत्वाच्या (व्हीआयपी) असणार असून त्यापुढे आद्याक्षरांनुसार रांगा असणार आहेत. नाट्यगृहांच्या घटलेल्या आसनक्षमतेमुळे हाऊस फुल्ल प्रयोग होणार्या नाट्य निर्मात्यांना गडकरी आणि काशीनाथ दोन्ही नाट्यगृहांना सारखेच भाडे भरावे लागणार असले तरी त्यातून मिळणार्या उत्पन्नात मात्र तफावत असणार आहे.
ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा केंद्रबिंदू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे गेल्या वर्षभरापासून नुतनीकरणाचे काम सुरू आहे.आधी रंगभूमी दिन नंतर 26 जानेवारी, 1 मे आणि आता जुलै उजाडला तरी गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने नाट्यवर्तुळाईतकीच ठाणेकरांमध्येही नाराजी आहे. नुतनीकरणात गडकरी रंगायतन पूर्णतः कात टाकली आहे, ही बाब सुखावणारी असली तरी हाऊसफुल्ल गर्दी खेचणार्या नाट्य- नृत्य आणि संगीतविषयक कार्यक्रम करणार्या संस्थांमध्ये नाराजीची भावना आहे. गडकरी रंगायतनची
पूर्वीची आसनव्यवस्था 1056 इतकी होती, नुतनीकरणात या आसनक्षमता सुमारे 160 ते 170 आसनांनी घट झाल्याने निर्मात्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली आहे. पालिकेच्या मालकीच्या असलेल्या गडकरी आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृहांसाठी सोमवार ते शुक्रवारसाठी नाटकांसाठी 13 हजार, वाद्यवृंदांसाठी 15 हजाराच्या घरात भाडे आकारले जाते. वीकेंडला नाटक आणि वाद्यवृंदासाठीचे भाडे हे 19 ते 20 हजारांच्या घरात असते. दोन्ही नाट्यगृहांना सारखेच भाडे आकारले जाते, काशीनाथ घाणेकर नाट्यगृहांची आसनक्षमता 1200 च्या घरात आहे. दोन्ही नाट्यगृहांच्या भाड्याचे दर तेच मात्र हाऊसफुल्ल कार्यक्रमांना गडकरी रंगायतनच्या घटलेल्या आसनक्षमतेमुळे निर्मात्यांना उत्पन्नात झळ बसणार आहे. त्यामुळे निर्मात्यांचा ओढा घाणेकर नाट्यगृहाकडे राहण्याची शक्यता आहे.
गडकरी रंगायतनचे उद्घाटनची तारीख आता 15 ऑगस्ट सांगितली जात आहे, पण प्रत्यक्षात तेव्हा तरी नाट्यगृह सुरू होते की नाही, याची प्रतीक्षा कलाकारांना आणि ठाणेकरांना आहे. गडकरी रंगायतनमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट असणार आहे. तसेच शौचालयांच्या संख्येत देखिल वाढ करण्यात आली आहे.