ठाणे : नूतनीकरण झालेल्या गडकरी रंगायतनाच्या उद्घाटनानंतर नवनवीन वाद उफाळून येत असून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. माजी खासदार आनंद परांजपे यांच्यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका एकाच्या रिमोट कंट्रोल वर चालते, ते सांगतील तेवढेच दाखवले जाते अशी नाराजी नामोल्लेख टाळून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत व्यक्त केली.
नगरविकास विभागाने दिलेल्या 31 कोटी रुपयांच्या निधीतून गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करण्यात आले. त्याचे उद्घाटन नुकतेच झाले. त्यावेळी ठाणे महापालिकेकडून दाखवण्यात आलेल्या चित्रफितीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तत्पूर्वी गडकरी रंगायतनामधील भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या दोन कोनशिला दर्शनी भागातून अडगळीत बसविल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रवक्ते आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त करीत दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचा वारसा चालविण्याचा दावा करणार्यांनी पुन्हा त्या कोनशिला दर्शनी भागात लावण्याचा टोला हाणला होता.
यावरून ठाण्यात महायुतींमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येत असून शिवसेनेसमोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हतबल असल्याचे दिसून येते. ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेवर ही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. त्यावेळी या दोन्ही पक्षांना महापालिका प्रशासनाने फारसे विचारात घेतले नसल्याची नाराजी दोन्ही पक्षांनी व्यक्त केली होती. आता गडकरी रंगायतन च्या उद्घाटनाचा नवा वाद उफाळून आला आहे.
ठाणे महापालिका प्रशासन नेहमी एकतर्फी वागत असल्याचा गंभीर आरोप आमदार केळकर यांनी करीत उद्घाटनप्रसंगी दाखविण्यात आलेल्या चित्रफितीतून केळकर यांच्या आमदार असताना सलग 11 प्रयोग करण्याच्या विक्रमाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यावर नाराजी व्यक्त करीत केळकर म्हणाले, गेल्या 40 वर्षात मी एकमेव आमदार आहे, ज्यांनी नाटकाचे 150 व्यावसायिक प्रयोग केले. याच गडकरी रंगायन मध्ये नाटकाचे सलग 11 प्रयोग करण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे. त्याची दखल नाट्यगृहाच्या इतिहासावर बनविलेल्या चित्रफित घेण्यात आलेली नाही. हा प्रकार एका रिमोट कंट्रोल करणार्याच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोपही त्यांनी केला. असे प्रकार वारंवार होत असून भाजपला डावलले जात असल्याची नाराजी व्यक्त केली.
सन्मान राखलाच पाहिजे
माजी खासदार आनंद परांजपे यांच्या कोणशीलाबाबत नाराजीचे समर्थन करताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे , आनंद दिघे यांच्याप्रमाणे दिवंगत खासदार सतीश प्रधान यांचे गडकरी नाट्यगृह आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम उभारण्यात मोठे योगदान होते, त्यांचा सन्मान राखलाच पाहिजे असे म्हणत आमदार केळकर यांनी शिवसेना नेत्याच्या वागण्यावर, कृतीवर नाराजी व्यक्त केली.