ठाणे : सी सी टिव्हीकॅमेर्या प्रमाणेच सोशल मीडियाचा तिसरा डोळा समाजात घडणार्या चांगल्या वाईट गोष्टी जगासमोर दाखवत असून, दोन महिला रिक्षा चालकांच्या हाणामारीचा व्हिडिओ प्रसारित होताच ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. दोन्ही रिक्षा जप्त करून संबधित महिलांना कार्यालयाद्वारे समज देण्यात आलेली आहे.
कापूरबावडी रिक्षा स्टँड परिसरात बुधवारी काही कारणांवरून दोन महिला रिक्षा चालकांमध्ये काही कारणांवरून तू तू मैं मैं झालं पुढे भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यानच्या वेळेत दोन्ही महिलांची जुंपली असताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असताना, प्रादेशिक परिवहन विभागाने या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या आदेशावरून या दोन्ही रिक्षांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून, रिक्षा जप्त केल्या असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.
ठाणे शहरात रिक्षा चालकांनी सामान्य नागरीकांना त्रास होईल व शहराची तसेच रिक्षा चालकांची प्रतिमा मलीन होईल अस कोणतही कृत्य करु नये. वाहतूक नियमांची पायमल्ली करणार्या व उद्धट वर्तन करणार्या रिक्षाचालकांवर परिवहन विभागाद्वारे सक्त कारवाई केली जाईल.हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे