Weather Report
कोकण किनारपट्टी भागात मुसळधार आणि दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  file photo
ठाणे

कोकणात आणखी चार दिवस अतिमुसळधार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : समुद्र सपाटीपासून साडेपाच किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा प्रबळ झाला आहे. त्यामुळे रविवार (दि.३०) पर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार आणि दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. पालघर आणि रायागड जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी (दि.२६) सकाळी साडेआठ या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ५३.५३ मि.मी.च्या सरासरीने ४८१.८० मि.मी. एकूण पावसाची नोंदझाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात २८.४० मि. मी. दापोलीत ७०.६०, खेडमध्ये ४१.३०, गुहागरात ६३.२०, चिपळूण तालुक्यात ४४.६०, संगमेश्वरमध्ये ५२.२०, रत्नागिरीत ७४.६०, लांजा तालुक्यात ६०.२० आणि राजापूर तालुक्यात ४६.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसात रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात तब्बल सव्वाशे मि.मी. एकूण पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ६२१ मि.मी. च्या सरासरीने एकूण साडेपाच हजार मि.मी. एकूण पाऊस झाला आहे.

मोसमी पावसाची वाटचाल कोकण किनारपट्टी भागात वेगाने होताना दिसत आहे. यामुळे सागरी किनारी भागात अर्थातच कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. ३० जून अखेरपर्यंत कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी काही ठिकाणी कोसळत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- सातेरे जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता खचला आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याने सुमारे १५० मीटर लांबीचा रस्ता खचला. धरण परिसरातील रस्ता असल्याने मृद जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम मार्फत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे

जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

कोकणात बुधवारी पावसाची संततधार सुरू असून, गेल्या चोवीस तासांत खेडमध्ये ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी (दि.२६) दुपारी २ वा. पासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने पाच मीटर ही इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणेला सतर्क राहण्याचा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी शहरालासुद्धा पाणीपुरवठा करणारे शीळ धरण तुडूंब भरून वाहू लागल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.

शीळ धरण 'ओव्हरफ्लो'

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाने बऱ्यापैकी जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्याची पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. रत्नागिरी शहरालासुद्धा पाणीपुरवठा करणारे शीळ धरण तुडूंब भरून वाहू लागल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. शीळसह पानवल आणि कळझोंडी धरणही भरले आहे.

यावर्षी मोसमी पाऊस वातावरणीय प्रतिकुलतेने जिल्ह्यात दाखल होण्यास उशीर झाला. अडलेल्या स्थितीत असलेल्या मोसमी पावसाच्या सक्रियतेबाबत अडचणी झाल्या. अखेर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस सक्रिय झाला. पाऊस सक्रिय झाल्यानंतर पाच दिवसाच्या प्रवासाने आता पाणलोट क्षेत्रात सिंचनाला बळ मिळाले आहे.

खालावलेल्या स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात आता सिंचनाची टक्केवारी वाढू लागली आहे. रत्नागिरीत गेल्या दीड ते दोन महिने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. पाऊस लांबल्याने काही दिवसापूर्वी पाणीबाण ची वेळ रत्नागिरीकरांवर आली होती. परंतु गेल्या पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शीळ धरणातील पाणीसाठा वाढला आहे. शीळ धरण ओव्हरफ्लो झाल्याचे दिसत आहे. शहरवासीयांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यात यावर्षी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र पावसाने जोर धरल्यावर पाणी टंचाई दूर होईल

SCROLL FOR NEXT