ठाणे : मीरा-भाईंदर शहरात एका मोठ्या आंतरराज्यीय आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून, पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पंजाबमधील निवृत्त पोलिस महासंचालकांच्या बँक खात्यातून तब्बल 8 कोटी रुपये ऑनलाईन लंपास केल्याप्रकरणी मीरा-भाईंदर आणि ठाणे परिसरातून सातजणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भाजप आमदाराचा निकटवर्तीय आणि भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी रंजित ऊर्फ शेरा ठाकूर याचा समावेश आहे.
पंजाबचे माजी पोलिस महासंचालक अमरसिंग चहल यांची 8 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचे धागेदोरे मीरा-भाईंदरपर्यंत असल्याचे पंजाब पोलिसांना आढळून आले. त्यानुसार पंजाब पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करत एकूण सातजणांना ताब्यात घेतले. यात भाईंदरमधून चार आणि ठाण्यातून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रंजित ऊर्फ शेरा ठाकूर, चंद्रकांत अंबोला, आशिष कुमार, सोमनाथ सोनपत, लखन श्रीचंद, मोहम्मद हासिम, प्रतीक उत्तम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.