ठाणे : भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना ठाण्याच्या भिवंडीतील पूर्णा येथील आकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून ॲडमिट असलेल्या कांबळी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतही एका रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
मुंबईत कांजूरगाव येथे राहणारे विनोद कांबळी दोन दिवसांपूर्वी घरात चक्कर येऊन कोसळले. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना कावीळ झाल्याचे आणि व्हायरल इन्फेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय त्यांच्या मेंदूला थोड्याफार प्रमाणात सूज आल्याचे डॉक्टरांनी निदान केले. या कारणास्तव त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कांबळी यांना चालताना त्रास होतो. त्यांना डोकेदुखी, ताप, पोटदुखी आणि इतर आजाराच्या तक्रारी आहेत, असे डाॅक्टरांनी सांगितले असून सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे तरीही पाच-सहा दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, असेही आकृती हॅास्पिटलमधील डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विनोद कांबळी यांना रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांना संसर्ग, ताप, रक्तदाब कमी झाला होता. यामुळे त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. आता त्यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. न्यूरोलाॅजीस्टशी संपर्क साधून आवश्यक तपासण्या केल्या असून अजून काही चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे त्यांना पाच ते सहा दिवस उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागणार आहे.डॉ. विवेक द्विवेदी, आकृती रुग्णालय