शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसैनिक महिलेने मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Pudhari News Network
ठाणे

श्रेयवादातून शिंदे गटात फ्री स्टाईल; माजी नगरसेवकाला शिवसैनिक महिलेकडून मारहाण

Dombivli News : समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याणात सार्वजनिक कामाच्या श्रेयवादावरून शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिंदे गटाच्या शिवसैनिक महिलेकडून बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आदल्या दिवशी रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये झालेला वाद दुसऱ्या दिवशी कार्यालयातून अर्थात चार भिंतीतून रस्त्यावर आला. त्यानंतर हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. राणी कपोते असे मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे. माजी नगरसेवक मोहन उगले यांना राणी कपोते यांनी कार्यालयातून मारहाण करत रस्त्यावर आणून पुन्हा मारहाण केल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे.

कल्याण पश्चिमेकडे असलेल्या मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता. हा कार्यक्रम रविवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्याठिकाणी शिंदे गटाच्या राणी कपोते पोहोचल्या. या रस्त्याच्या कामासाठी आपण पाठपुरावा केल्याचा दावा राणी कपोते यांनी केला. या विधानावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ झाला. त्यावर माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा आपण केल्याचा दावा केला. हा राग राणी कपोते यांनी धरला होता.

सोमवारी दुपारच्या सुमारास अहिल्याबाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले आमने सामने आले. राणी कपोते यांनी तू मला शिव्या का देतोस ? माझ्यासोबत गैरवर्तन का करतोस ? असा जाब विचारत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला. तेथील कार्यालयातून उगले यांना झोडपले. शिवाय बाहेर आणून भररस्त्यात त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत उगले यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच पक्षाच्या दोन्ही कार्यकर्त्यांचा एकमेकांवरील श्रेयवाद चव्हाट्यावर आला आहे. राणी कपोते यांनी मोहन उगले यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तर मोहन उगले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT