नेवाळी: यंदाच्या कडक उन्हाळ्यात रानमेवा बाजारात दाखल झाला असून जांभळं, करवंद आणि मौदूरला चांगलीच मागणी वाढली आहे. जांभळं तब्बल 400 रुपये किलो दराने विकले जात असून करवंद प्रति वाटी 25 रुपये तर मौदूर 20 रुपये वाटा या दराने विकले जात आहेत. वाढत्या दरांमुळे रानमेव्याला अक्षरशः सोन्याचा भाव आला असल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने आदिवासी बांधव सकाळी लवकर डोंगरदऱ्यांतून रानमेवा गोळा करून रस्त्यांच्या कडेला, महामार्गांवर तसेच अंबरनाथ, कल्याण, दादर रेल्वे स्थानक परिसरात विक्रीसाठी दाखल होत आहेत.
पहाटेपासूनच ग्राहकांची गर्दी होत असून ताज्या रानमेव्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आदिवासी सांगत आहेत. भरमसाट सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे यंदा रानमेवा कमी प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दर वाढले असून आदिवासींना उन्हाचा सामना करत डोंगरदऱ्यांत फिरून रानमेवा गोळा करावा लागत आहे. मेहनत जास्त आणि माल कमी असल्याने भाव वाढल्याचे आदिवासी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
जांभूळ गुणकारी
जांभळाच्या बियांमध्ये जंबोलिन आणि जंबोसिन हे घटक असतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. बियांची भुकटी रिकाम्या पोटी घेतल्यास मधुमेहींना फायदा होतो, असे जाणकार सांगतात. तसेच पोटदुखी, बद्धकोष्ठता, अतिसार यांसारख्या त्रासांवरही जांभूळ गुणकारी मानले जाते.
मौदुराच्या तेलाला बाजारात मागणी
करवंदाचे सरबत किंवा पन्हे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. भूक वाढवणे, अपचन, मळमळ कमी करणे यासाठीही करवंद फायदेशीर असल्याचे डॉक्टर सांगतात. तर मौदूराची फुले औषधी असून फळांची भाजी केली जाते. त्याच्या बियांपासून निघणाऱ्या नैसर्गिक तेलाला बाजारात सर्वाधिक मागणी असल्याने मौदूरलाही चांगला भाव मिळत आहे.