सापाड : डोंबिवली परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जागेच्या वादातून एका फुल विक्रेत्या फेरीवाला महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेण्याचा नाट्यमय प्रकार केला. सुदैवाने, उपस्थित नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील फुल मार्केट परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी फुलांचा फेरी व्यवसाय करत होती. मात्र, अलीकडेच जागेवरून दुसऱ्या विक्रेत्यासोबत तिचा वाद सुरू होता. प्रशासनाने त्या ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाईची नोटीस दिल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वाद चिघळत गेल्यानंतर संतापाच्या भरात त्या महिलेने डिझेलची बाटली काढून अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृतीने परिसरात गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाव घेत तिला थांबवले, तसेच डोंबिवली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी पोलिसांनी महिलेची चौकशी सुरू केली असून, जागेच्या वादामागील खरी पार्श्वभूमी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, महिला आणि दुसरा विक्रेता दोघेही अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी व्यवसाय करत होते आणि यामुळे तणाव निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रशासनाने फेरीवाल्यांसाठी योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की संबंधित महिला सुरक्षित आहे. तिला शांत केले असून, आम्ही तिचे निवेदन घेत आहोत. जागेच्या वादातून असा प्रकार घडला आहे. पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेने फेरीवाल्यांच्या समस्या आणि जागावाटपातील गैरव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कडेवरील मुलासही मारण्याचा प्रयत्न
विशेष म्हणजे या व्यापारी महिलेने स्वतःवर डिझेल टाकता टाकता कडेवर असणाऱ्या आपल्या मुलावर देखील डिझेल टाकून त्यालाही मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणामुळे डोंबिवली हादरून गेली आहे. हा संपूर्ण प्रकार पालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या डोळ्यादेखत झाला झाला असल्यामुळे आता पोलीस कर्मचारी आणि पालिका अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.