डोंबिवली : राज्यभर गाजत असलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या पहिल्याच धडकेत कल्याणातील मोठा मासा गळाला लागली आहे. कल्याणच्या मध्यवस्तीत वर्षानुवर्षे दिमाखात सुरू असलेल्या नामांकित प्रिन्स बेकरीच्या मुजोरीला मुंढे यांनी थेट टाळे ठोकून लगाम लावला आहे. एफडीएचे पथक बेकरीत घुसताच एकच धावपळ उडाली आणि काही वेळातच बेकरीच्या मुख्य भट्टीला सील ठोकण्यात आले.
काय आहे नेमका प्रकार ?
या बेकरीतून गेल्या अनेक महिन्यांपासून विषारी धूर ओकला जात होता. लाकडाच्या अवाढव्य भट्ट्यांमध्ये पाव भाजला जात होता. त्यातून निघणाऱ्या काळ्या-कभिन्न धुरामुळे आणि उडणाऱ्या कोळशाच्या राखेमुळे आजूबाजूच्या शेकडो रहिवाशांचे जगणे नकोसे झाले होते. लहान मुलांना विशेषतः वृद्ध मंडळींना श्वास घेणे मुश्किल झाले होते.
याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तर स्पष्ट आदेशच दिले आहेत. लाकूड आणि कोळशाच्या प्रदूषणकारी भट्ट्या तात्काळ बंद करा आणि एलपीजी, पाईप गॅस किंवा इलेक्ट्रिक ओव्हन वापरा. पण प्रिन्स बेकरीच्या मालकांनी या आदेशाला थेट केराची टोपली दाखवत आपला धंदा बिनदिक्कत सुरू ठेवला होता. त्रस्त झालेल्या रहिवाशांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचताच, मुंढे यांनी कोणताही विलंब न लावता पथकाला कारवाईचे आदेश दिले. तपासात धक्कादायक सत्य समोर आले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सर्रास भंग करून आजही लाकडाच्या भट्टीवरच पावाची निर्मिती सुरू होती. पुरावा हाती लागताच अधिकाऱ्यांनी कोणाचीही गय न करता कारवाईचा बडगा उगारला.
या पुढे नंबर कुणाचा ?
बेकरीतील कर्मचारी नसीम खान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना सांगितले की, फक्त एकच भट्टी सील केली आहे, बाकी सुरू आहेत. आम्हाला नोटीस दिली नाही. पण कायद्याचे उल्लंघन केल्याचे उघड असल्याने प्रशासनाने त्यांचे एकही ऐकले नाही. मुंढे यांच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे कल्याण-डोंबिवलीतील प्रदूषण पसरवणाऱ्या आणि नियमांना वाकुल्या दाखवणाऱ्या शेकडो बेकरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. आता पुढचा नंबर कुणाचा ? याचीच चर्चा सध्या रंगली आहे.