डोंबिवली : कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातील सात कैद्यांनी मिळून रेल्वे सुरक्षा दलातून तुरुंगात आलेल्या एका बंदीवान कैद्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.४) सकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यासाठी दगड आणि पत्र्याच्या बादलीचा वापर करण्यात आला आहे. या हल्ल्यातून कैदी बचावला असून त्याच्या डोळ्यासह डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी जखमी कैद्याने दिलेल्या जबानीवरून खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणा येथील रेल्वे सुरक्षा दलात नोकरीला असलेला एक जवान आधारवाडी तुरूंगात न्यायबंदी म्हणून दाखल आहे. हा कैदी तुरूंगातील सार्वजनिक नळाजवळ मंगळवारी सकाळी उभा होता. त्याच्या बाजूला उभा असलेला कैदी न्यायबंदी तुरूंतील अंतर्गत सेवेत रखवालदाराचे काम करतो. अचानक रखवालदार असलेल्या कैद्याच्या दिशेने तुरुंगातील इतर सात कैदी धाऊन आले. या सगळ्यांनी मिळून त्या कैद्याला मारहाण करण्यापूर्वीच जवान असलेल्या कैद्याने मध्यस्थी करून सातही जणांना तेथून परतून लावले. या सगळ्या गोष्टीचा राग त्या सात कैद्यांच्या मनात सलत होता.
या घटनेनंतर जवान कैदी स्वच्छतागृहात गेला असता त्याच्या पाठोपाठ सातही कैदी स्वच्छतागृहाजवळ जाऊन थांबले. स्वच्छतागृहातून जवान कैदी बाहेर येताच दबा धरून बसलेल्या सातही जणांनी मिळून त्याला लक्ष्य केले. दगड आणि पत्र्याच्या बादलीने चढविलेल्या हल्ल्यात रेल्वे सुरक्षा बलातील जवान असलेल्या पण आधारवाडी तुरूंगात न्यायबंदी असलेल्या जवानाच्या डोळ्यासह डोक्याला गंभीर दुखापती झाल्या. या मारहाण प्रकरणी आधारवाडी कारागृहातील अधिकाऱ्यांचे पत्र पोलिसांना मिळाले असून मारहाण झालेल्या न्यायबंद्याचा जबाब नोंदवून हल्लेखोर सात न्यायबंद्यांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.