Amudan blast victims protest Pudhari
ठाणे

Amudan blast victims protest: आमच्या डोळ्यांतले अश्रू कधी पुसणार? बाधितांचा सवाल

डोंबिवलीतील अमुदान-प्रोबेस स्फोटातील मृतांना शिवसेनेची श्रद्धांजली

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: बाबा, रोहिणी परत कधी येणार? हा प्रश्न गेली दोन वर्षे चंद्रकांत कदम यांच्या काळजाला दररोज घर करतो आहे. अमुदान स्फोटात आपली 22 वर्षांची लेक गमावलेल्या या बापाच्या डोळ्यांत आजही पाणी दाटले होते. बाजूलाच उभ्या सरला जोंधळे यांना पती मनोज यांची आठवण कोंडून ठेवता आली नाही.

त्यांच्या डोळ्यांतील अश्रू सांगत होते की 2 वर्षांनंतरही जखमा ताज्याच आहेत. या दोघांसारख्या अनेक बाधित कुटुंबांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरला. डोंबिवली एमआयडीसी फेज - 2 मधील अमुदान कंपनीसमोर शनिवारी सकाळी मृतांना श्रद्धांजली वाहून बाधितांच्या नुकसान भरपाईसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत, माजी विभागप्रमुख राजू नलावडे, जिल्हा सचिव सुधीर ऊर्फ भैय्यासाहेब पाटील, युवा जिल्हा अधिकारी प्रतिक पाटील, शहरप्रमुख सुरेश परदेशी, उपतालुका प्रमुख किरण पाटील, उपशहरप्रमुख जगदीश जुलूम, विभागप्रमुख राजेंद्र सावंत, मंगेश मोरे, सखाराम वांद्रे, उपविभागप्रमुख शैलेश गवळी, विलास नायर, मंदार स्वर्गे, शाखाप्रमुख संजय मांजरेकर, अभय दिघे, मंगेश सरमळकर, हेमंत धिमावकर, राजू पवार, प्रियांका कार्लेकर, श्रध्दा नाईक, समीर सबनीस, विकी ठोंबरे, पंडित पाटील, वैभव संते, अनुज मोरे, स्वप्निल पाटील, सर्वपक्षिय युवा मोर्चाचे मुख्य संघटक गजानन पाटील, मुकुंद म्हात्रे, सुनील पाटील, अनंत बडेकर, संदीप पालकरी यांच्यासह 45 शिवसैनिक व बाधित नागरिक सहभागी झाले होते.

डोंबिवली एमआयडीसीत दोन शक्तिशाली स्फोट झाले. या दुर्घटनांनंतर दहा वर्षांची प्रतीक्षा आहे, मात्र प्रश्न एकच आहे. अमुदान कंपनी स्फोटाला 2 वर्षे आणि प्रोबेस स्फोटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही घटनांनी डोंबिवली हादरली होती.

शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. चौकशी झाली, गुन्हे दाखल झाले, आश्वासनांची खैरात झाली. पण न्याय आणि पूर्ण नुकसान भरपाई आजही मिळालेली नाही. घर गेलं, माणसं गेली, आयुष्याची राखरांगोळी झाली. सरकारने फक्त कागदावरच मदत केली.

प्रत्यक्षात आमच्या झोळीत काहीच पडलेलं नाही, असे म्हात्रे पाडा येथील मालमत्ता नुकसानग्रस्त मुकेश म्हात्रे यांनी भरल्या आवाजात सांगितले. या आंदोलनाला अमुदान स्फोटात मृत्यू झालेल्या रोहिणी कदम यांचे वडील चंद्रकांत कदम आणि मनोज जोंधळे यांच्या पत्नी सरला जोंधळे या स्वतः उपस्थित होत्या.

त्यांच्या उपस्थितीने वातावरण भावूक झाले होते. माझी पोरगी परत येणार नाही, पण निदान तिच्या नावाने न्याय तरी मिळू दे. इतर बाधितांचे तरी संसार उभे राहू दे, असे चंद्रकांत कदम कापऱ्या आवाजात म्हणाले.

शिवसेनेने ही लढाई इथेच थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक शिष्टमंडळ आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहे. या प्रकरणाचे निवेदन त्यांना देऊन विधिमंडळात हा प्रश्न मांडला जाणार आहे. प्रशासनाला जागे करू,बाधितांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार अभिजीत सावंत यांनी व्यक्त केला.नुकसान भरपाई द्या ! या घोषणांनी एमआयडीसी परिसर दुमदुमला.

श्रद्धांजलीतून निघाला आक्रोशाचा एल्गार

आंदोलनाची सुरूवात मृतांना सामूहिक श्रद्धांजली वाहून झाली. पण नंतर त्याचे रूपांतर संतापात झाले. 2 वर्षे झाली, 10 वर्षे झाली, तरी सरकार झोपले आहे. बाधितांच्या डोळ्यांतील अश्रू पुसायला कुणीच येत नाही, अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. जखमी झालेल्या, कायमचे अपंगत्व आलेल्या आणि मालमत्तेचे नुकसान झालेल्या बाधितांना तत्काळ शासकीय नुकसान भरपाई मिळावी, ही प्रमुख मागणी यावेळी लावून धरण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT