ठाणे: मुंबईतील डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया आणि नाशिकमधून पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करत, एका इंग्रजी वृत्तपत्राच्या सेवानिवृत्त व्यक्तीला सव्वा कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली. त्यांच्या आधारकार्डचा वापर करत सीमकार्ड घेत, त्याद्वारे लोकांना धमकावले जात आहे. त्या आधारकार्डद्वारे बँक खाते उघडून त्या खात्यातून दहशतवादी संघटनांशीसंबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगून ही फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एका इंग्रजी वृत्तपेपरमधून सेवानिवृत्त झालेले 64 वर्षीय व्यक्ती हे शेअर मार्केट ट्रेडिंग करतात. 11 नोव्हेंबर 2025 रोजी घरी असताना, त्यांना राजेश कुमार नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने तो डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया मुंबई येथून बोलत असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना त्याने त्यांच्या आधारकार्डचा वापर करुन त्याद्वारे नाशिक येथे एका मोबाईल कंपनीचे सीमकार्ड कोणीतरी घेतले. तसेच त्या सीमकार्डचा वापर लोकांना धमकावण्याकरीता करण्यात येत आहे. याप्रकरणी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नाशिक पोलीस संपर्क करतील त्याच्याशी बोलुन घ्या असे राजेश कुमार चौधरी यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांना एका इसमाने ते पंचवटी पोलीस ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक बोलत असल्याचे सांगितले.
राजेश कुमार यांच्या प्रमाणेच हकीकत सांगितली. तसेच तक्रारदार यांच्या आधारकार्ड वापरुन त्यांच्या नावाने नाशिक येथे बँकेत अकाऊंट उघडण्यात आले आहे. त्यात मोठ्या प्रमानात अवैधरित्या पैशांचे व्यवहार चालु आहेत व त्या अकाऊंट मध्ये दहशतवादी संघटनांशी संबंधीत लोकांशी आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसुन येत आहे. तसेच मनी लाँड्रींग होत असल्याचे सांगितले.
त्यामुळे सदर गुन्हा हा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे फंड रेग्युलरायीज करण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुक करण्याच्या उद्देशाने तक्रारदार यांना विविध बँक खात्यांवर एकूण एक कोटी 25 लाख 50 हजार 280 रुपये ट्रान्सफर करायला लावत, फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत, गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.