कल्याण डोंबिवली महानगरपालिका pudhari file photo
ठाणे

KDMC fake ward map viral : केडीएमसी क्षेत्रात बोगस प्रभाग रचना व्हायरल

पालिका प्रशासनाच्या निवडणूक विभागाने घेतली दखल; अफवा पसरविणार्‍यावर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू असून प्रभाग रचना जाहीर करण्या पूर्वीच पालिका क्षेत्रात संभाव्य प्रभाग रचनेचा मजकूर व्हायरल झाल्याने पालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या बोगस संभाव्य प्रभाग रचनेची दखल पालिका प्रशासनाने सदरचा मजकूर हा पूर्णतः खोटा असल्याचा निर्वाळा देत महापालिकेशी काहीही सबंध नसल्याचे स्पष्ट करीत अफवा पसरविणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच 31 जुलै पर्यंत प्रारुप प्रभाग रचना मसुदा तयार करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची आगामी पालिका निवडणुक प्रथमच बहु सदस्यीय पॅनल पद्धतीने घेतली जाणार असून चार प्रभागाचा एक पॅनल असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या इच्युक उमेदवारांना प्रभागाची रचना कशी असणार असून कोण कोणते चार प्रभाग जोडून पॅनल तयार केले जाणार याची उत्कंठा लागली आहे.

पालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू असतानाच पालिका क्षेत्रातील प्रभागा प्रभागात संभाव्य प्रभाग रचनेचा प्रारुप असलेला मजकूर गेल्या काही दिवसा पासून व्हायरल झाल्याने आपला प्रभाग कोणत्या प्रभागाला जोडला गेला व कोणत्या पॅनलमध्ये असणार या बाबत चर्चेला उधाण आले आहे पालिका निवडणूक विभागाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापूर्वी व्हायरल झालेल्या बोगस प्रभाग रचने च्या मजकुराची दखल घेतली आहे.

शासनाने केडीएमसीतील निवडणुका घेण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असुन, सदर निवडणुकांसाठी महापालिकांची प्रभाग रचना करण्या बाबतचे 10 जुन, 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशात प्रभाग रचना करणेसंबधात मार्गदर्शक तत्वे व नियम निश्चित केलेली आहेत. तसेच 23 जुन, 2025 रोजी प्रभाग रचना करणेबाबत शासनाने सुधारीत कालबध्द कार्यक्रम आखून दिलेला असून महापालिका स्तरावर दिनांक 31 जुलै, 2025 पर्यंत प्रारुप प्रभाग रचना मसुदा तयार करून मसुदा राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सादर करणार असून सदर प्रारुप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर जाहिररित्या प्रसिध्दी केल्यावर नागरीकांच्या हरकती व सूचना 22 ते 28 ऑगस्ट, 2025 च्या दरम्यान मागविणेत येणार आहेत.

प्राधिकृत अधिकारी यांचेकडून सुनावणी घेण्यात येणार

शासन राजपत्र, राज्यस्तरीय वर्तमानपत्र, महाराष्ट्र शासन व महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट आणि महापालिका कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर प्रसिध्दी दिली जाणार आहे. या कालावधीत आलेल्या हरकती सूचनांवर शासनाकडून नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांचेकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकती सुचना वरील शिफारशी विचारात घेऊनच निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रभाग रचना अतिम केली जाणार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT