ठाणे : मयत नगरसेवकाच्या नावाने एक फेसबुक अकाउंट सुरू असून त्यावर चक्क सत्ताधार्यांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी काही जणांच्या तक्रारीवरून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मात्र, संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरही सदर फेसबुक अकाउंटवर पोस्ट होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सत्ताधार्यांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी एका निरपराध तरुणाला ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणाला पोलिसांनी तत्काळ सोडावे; अन्यथा, या दडपशाहीधिरोधात जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमीत सरैय्या यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवंगत भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुकवर एक अकाउंट चालविले जात आहे. या अकाऊंटवरून शिवसेनेशी संबधित असलेल्या माजी नगरसेवकांवर टीकाटिप्पणी करणार्या पोस्ट टाकण्यात येत आहेत. या प्रकरणी शिवसैनिकांच्या तक्रारीवरून शिवसेना (उबाठा)च्या चंद्रेश यादव याला श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमीत सरैय्या गेले असता त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. तर, त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक आणि दिवंगत विलास कांबळे यांचे बंधू सुरेश कांबळे हे श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले असता, पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप कांबळे यांनी केला.
दरम्यान, या संदर्भात अमीत सरैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन, श्रीनगर पोलीस ठाणे हे शिवसेनेची शाखा झाली आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना जसे वाटते तसेच केले जात आहे. चंद्रेश यादव हा गरीब घरातील तरुण मुलगा असून त्याला पोलिसांनी नाहक ताब्यात घेऊन मारझोड केली आहे. जर चंद्रेश यादव हे फेक अकाउंट चालवत असता तर त्याला ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनंतर टायगर अभी जिंदा है, अशी पोस्ट आलीच असती कशी? चंद्रेशच्या आईवडिलांनी आपणास फोन केल्याने आपण पोलीस ठाण्यात जाऊन बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण, ब्रिटिशांप्रमाणे वागणार्या पोलिसांनी आपले म्हणणे ऐकून घेतले नसल्याचा आरोप सरय्या यांनी केला आहे.