Medical Waste Pudhari
ठाणे

Medical Waste: मोहने परिसरात मुदतबाह्य औषधांचा ढीग; उल्हास नदीकाठी मेडिकल वेस्टमुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर

जैववैद्यकीय कचऱ्याची अशा प्रकारे उघड्यावर विल्हेवाट लावणे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा: कल्याणजवळील आंबिवली येथील मोहने परिसरात यादव नगर स्मशानभूमीजवळ आणि उल्हास नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे व मेडिकल वेस्टचा ढीग आढळून आल्याने पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नदीकाठी उघड्यावर टाकण्यात आलेल्या या कचऱ्यामुळे परिसरातील स्वच्छतेवरही गंभीर परिणाम होत असून, हा भाग मिनी डम्पिंग ग्राउंड बनत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

अ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील या ठिकाणी मेडिकल वेस्टची नियमानुसार विल्हेवाट लावण्याऐवजी रस्त्याच्या कडेला आणि नदीकिनारी मुदतबाह्य औषधे व इतर वैद्यकीय कचरा फेकण्यात आल्याचे दिसून आले. जैववैद्यकीय कचऱ्याची अशा प्रकारे उघड्यावर विल्हेवाट लावणे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकाराची माहिती अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सध्या एसआयआरच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने या प्रकरणाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याची कबुली त्यांनी दिल्याचे समजते.

दरम्यान, कल्याण परिसरातील मेडिकल वेस्टचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, अशा प्रकारे मुदतबाह्य औषधे व जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात असल्यास पर्यावरण प्रदूषणाबरोबरच संसर्गजन्य आजारांचा धोकाही वाढू शकतो, अशी भीती नागरिक आणि ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

मेडिकल वेस्टच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करूनकारवाई करावी आणि परिसराची तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT