Thane Mahanagarpalika
धोकादायक इमारती खाली करण्याची मोहीम ठाणे महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. file photo
ठाणे

ठाण्यात न्यायप्रविष्ठ धोकादायक इमारती रिकाम्या करा : आयुक्त सौरभ राव

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पावसाळा आला की शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येते. मात्र शहरातील काही जुन्या आणि धोकादायक इमारतीवरून विकासक आणि रहिवाशांमधे वाद असल्याने घराचा ताबा सोडला की राहते घर विकासकांच्या घशात जाण्याच्या भीतीने रहिवाशी घरे खाली करण्यास तयार नाहीत.

मात्र आता अशा इमारतींमध्ये पावसाळा संपेपर्यंत इमारती खाली करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता पालिकेच्या आवाहनाला रहिवाशी किती प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नागरिकांना सरळ घरे खाली करण्यास न सांगता तांत्रिक भाषेत भोगवटा रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धोकादायक इमारती संदर्भात मंगळवारी (दि.२३ रोजी बैठक घेण्यात आली असून या बैठकीत या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होवू नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही असेही निर्देश त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. परंतु, अशा इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील, तर त्यांनी दुरुस्ती करुन त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी, असेही आयुक्त राव यांनी नमूद केले. सदर या बैठकीस पालिकेचे महत्वाच्या पदांचे अधिकारी उपस्थित हाते.

20 इमारती अजूनही व्याप्त

प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्याय प्रविष्ठ / तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यास व्यत्यय न आणता, उर्वरीत कालावधीकरिता भोगवटा रिक्त करावा. कोणतीही जीवितहानी होवू नये, प्रत्येक नागरिक हा सुरक्षित रहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. ठाणे महापालिका क्षेत्रात, 96 अतिधोकादायक इमारती होत्या. त्यापैकी, 47 रिक्त करण्यात आल्या आहेत. 29 इमारतींचे तळमजला बांधकाम कायम ठेवून वरचे मजले पाडण्यात आले आहेत. सुमारे 20 इमारती अजूनही काही प्रमाणात व्याप्त आहेत.

SCROLL FOR NEXT