डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील बंदर रोडला असलेल्या खेळाच्या आरक्षित मैदानावर अतिक्रमण करून बहुमजली इमारत उभारल्या प्रकरणी बांधकामधारकाच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 सह भादंवि कलम 447, 34 अन्वये बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक उमेश यमगर (39) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेकडे बंदर रोडला असलेल्या मौलवी कंम्पाऊंड जवळ आरक्षण क्र. 98 हे खेळाचे मैदान, तर आरक्षण क्र. 97 बेघरांसाठी घरे या आरक्षणाने बाधित आहे. या भूखंडावर सलमान डोलारे यांनी अतिक्रमण करून अनधिकृतपणे बांधकाम परवानगी व्यतिरिक्त इमारतीमध्ये अतिरिक्त (वाढीव) मजल्यांचे बांधकाम केल्याचे अधीक्षक उमेश यमगर यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बंदर रोडला असलेल्या मोकळ्या भूखंडावर बेघरांसाठी घरकुल योजना, तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदान उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी या दोन्ही भूखंडांवर आरक्षण देखील टाकले आले आहे. आरक्षित भूखंडांच्या जागी केडीएमसीने तसे फलक देखील लावले होते. मात्र या भूखंडांवर अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यानंतर केडीएमसीने अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तशा प्रकारच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. अखेर केडीएमसीने आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण करणाऱ्या सलमान डोलारे यांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली आहे. या संदर्भात गुन्हा नोंदविल्यानंतर वपोनि सुरेशसिंह गौंड, पोनि लक्ष्मण साबळे आणि उपनिरी श्रीकांत चव्हाण यांनी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.