Eknath Shinde | ‘मी सुद्धा अनेक हंड्या फोडल्या’ एकनाथ शिंदेंचा विरोधकांना राजकीय टोला!  
ठाणे

Eknath Shinde | ‘मी सुद्धा अनेक हंड्या फोडल्या’, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना राजकीय टोला!

टेंभी नाका दहीहंडी उत्सवात अभिनेता गोविंदाच्या उपस्थितीने जल्लोषाला उधाण; ‘खोपटच्या राजाची ९ थरांची यशस्वी सलामी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून गोविंदांना प्रोत्साहन दिले. प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांची विशेष उपस्थिती हे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरले. गोविंदाच्या उपस्थितीने तरुणाईमध्ये उत्साह संचारला. संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दणाणून गेला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने विरोधकांना राजकीय टोला लगावला. “दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. टेंभी नाक्याची हंडी मानाची हंडी म्हणून ओळखली जाते. अनेक गोविंदा पथके येथे सलामी देऊन पुढे जातात. हा केवळ उत्सव नसून एकजूट आणि टीमवर्कचा खेळ आहे. थरावर थर रचत गोविंदा दहीहंडी फोडतात. दहा थरांचा विक्रम झाला म्हणून ठाणे ही गोविंदाची पंढरी आहे. मीसुद्धा अनेक हंड्या फोडल्या आहेत,” असे सांगत त्यांनी टोला लगावला.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याबरोबरच गोविंदांना विम्याचे संरक्षण देण्यात आले. दोन लाख गोविंदांचा विमा काढण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच ‘प्रो गोविंदा’ अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री असताना गोविंदा उत्सव अधिक उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

गोविंदांनी थर रचताना आपल्या सहकाऱ्याच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही शिंदे यांनी केले. “आपला सहकारी जखमी होणार नाही, याची काळजी घ्या. हा खेळ टीमवर्कचा आहे. उत्साहात गोविंदा खेळा,” असे ते म्हणाले. टेंभी नाक्याची हंडी ही जीवघेणी स्पर्धा नसून संस्कृती आणि परंपरा जपणारी हंडी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टेंभी नाका दहीहंडी उत्सवाचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अभिनेता गोविंदा यांच्या उपस्थितीने उत्सवाला मनोरंजनाचीही रंगत आली. गोविंदा यांनी आपल्या लोकप्रिय नृत्यशैलीची झलक दाखवत उपस्थितांची मने जिंकली. ‘किसी डिस्को में जाए’ या गाण्यावर त्यांनी थिरकताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला. गोविंदाच्या नृत्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याच उत्साहात खोपटच्या राजाने नऊ थरांची यशस्वी सलामी देत आपली ताकद दाखवली. त्यामुळे ठाण्यातील दहीहंडी उत्सवाची रंगत आणखी वाढली. परंपरा, साहस, एकजूट आणि मनोरंजनाचा संगम ठरलेल्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवाने यंदाही ठाण्याच्या गोविंदा संस्कृतीचा ठसा उमटवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT