ठाणे : मी टोल माफ करून टाकला, लेक लाडकी केली, ३ मोफत सिलेंडरचा गोरगरीबांना फायदा होतो आहे. मी आमदार असतांना टोल माफीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती, तेव्हा माझ्याकडे अधिकार नव्हते. पण अधिकार आल्यावर टोल माफी करायची मी ठरवले होते, त्यामुळे मी टोलमाफीचा मास्टर स्ट्रोक दिला, त्याचे श्रेय कुणालाही घेवू द्या, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. राज्यात आमच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती दिल्याशिवाय जनता राहणार नाही, पुढचे सरकार महायुतीचेच असेल आणि ते पारदर्शी कारभार करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
येथील रहेजा गृहसंकुलात दिवाळी पहाट कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून रहिवाशांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, रहेजा संकुलातील प्रसिध्द खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण संकुलाचे पदाधिकारी उपस्थितीत होते. मंत्री म्हणून मी विविध खात्यांचा कारभार सांभाळला, प्रत्येक विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला, पण हातात दोन - सव्वा दोन वर्षेच होती. या दोन सव्वा वर्षात राज्यातले रखडलेले, अडकलेले प्रकल्प आमच्या सरकारने सुरू केले. अटल सेतू, कोस्टल, ठाण्यातील मेट्रो, रिंगरोड सारखे प्रकल्प आम्ही सुरू केले. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. मोठ्या प्रमाणावर उद्योग महाराष्ट्रात आणून रोजगार आणण्याचा प्रयत्न आम्ही केला. कमी कालावधीत जास्त कामे करण्याचे भाग्य मला लाभल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
यावेळी प्रसिध्द गायिका मृदृला दाढे जोशी व गायक निलेश निरगुडकर यांची गायनाची मैफल झाली. या मैफलीत जुनी अवीट गोडींची गाणी व्दयींनी सादर केली. दिगंबर माने, पंकज बनसोडे, ऋर्षीराज साळवी, दिगंबर मानकर आशुतोष दांडगे उदय मटकर यांनी मैफलीला स्वरसाज चढवला.