घराणेशाहीमुळे लोकशाही धोक्यात! (Pudhari Photo)
ठाणे

Dynastic Politics | घराणेशाहीमुळे लोकशाही धोक्यात!

डोंबिवलीत शाळेच्या बसवरील बॅनरची खमंग चर्चा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळेने त्यांच्या बसवर लावलेला घराणेशाहीविरोधी संदेश सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. लोकशाही धोक्यात आहे. निवडणुका म्हणजे पैशांचा खेळ झाला आहे. एक कुटुंब, एकच उमेदवार असावा, अशा आशयाचा मजकूर असलेल्या या बॅनरने राजकारण्यांच्या घराणेशाहीकडे लक्ष वेधले आहे. नेटकऱ्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केलेल्या या बॅनरची सर्वत्र खमंग चर्चा सुरू झाली आहे.

सामाजिक भान जागृत ठेवणारे, विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे शाळेचे संस्थापक विवेक पंडित हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यांच्या पुढाकारातूनच हा बॅनर शाळेच्या बसमागे लावण्यात आला आहे. विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत लोकशाहीतील मूलभूत मूल्यांची जाणीव करून देणे हा त्यामागचा हेतू आहे. यापूर्वीही जनजागृतीपर बॅनर शाळेच्या बसवर लावले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका घरातील अनेक सदस्यांना मिळणाऱ्या उमेदवारीवरून लोकशाही धोक्यात येत असल्याचा उल्लेख या बॅनरद्वारे करण्यात आला आहे. पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, हा मुद्दा या बॅनरच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे. पक्षासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्यांना मागे सारून केवळ घराणेशाहीला प्रोत्साहन दिले जात असल्याने लोकशाहीची गुणवत्ता कमी होत असल्याची टीका या संदेशातून व्यक्त करण्यात आली आहे.

निवडणुका म्हणजे पैशांचा खेळ

आजकालच्या निवडणुका पैशांच्या खेळात परिवर्तित झाल्याने निवडून आल्यानंतर रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंटची काळजी घेतली जात असल्याचा थेट आरोप सदर बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या राज्यात आणि देशभरात उमेदवारी वाटपासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांमुळे बसवरील बॅनरद्वारे दिलेल्या संदेशाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्या निकेतन शाळेच्या या बॅनरचे नेतकऱ्यांकडून समाज माध्यमांवर मिश्र प्रतिसाद उमटत असले तरी लोकशाही, पारदर्शकता आणि राजकीय संस्कृतीवर चर्चेला उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT