Durgadi Fort Restoration
सापाड : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत अलीकडील मुसळधार पावसामुळे कोसळल्याने परिसरात चिंता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने त्वरित लक्ष घालून, भीत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचे अनेक भाग गेल्या काही वर्षांपासून कमकुवत झाले होते. पावसामुळे झालेली जमीन खच आणि पाण्याचा मारा सहन न झाल्याने भिंतीचा एक मोठा भाग जमीनदोस्त झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संबंधित पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने त्वरित घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर युद्धपातळीवर पुनर्बाधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक कामगार आणि संरक्षण तज्ज्ञांचा सहभाग असून, कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
दुर्गाडी किल्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर एक जनआक्रोश कल्याणात उभा राहिला. दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुज आणि भिंती नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली आणि पुरातत्त्व विभागाला जाग आली. पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील कामाची पाहणी केली.
आर्किटेक्चरनी या पडलेल्या भिंतीचा आढावा घेऊन अशा कामांमध्ये लाईम काँक्रिटीकरण केले जाईल असं सांगितले.
पावसाळा सुरू असल्यामुळे कामात थोडी दिरंगाई होईल परंतु काम थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण केले जाईल, असे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पावसाचा वेग वाढल्याने दोन भिंतीमधल्या मातीचा ढिगारा खाली आला. त्यामुळे भिंत कोसळल्याची माहिती पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर आता पुरातत्व विभाग व सार्वजनिक बांधकाम खाते कडकडून जागे होऊन कामाला लागले आहे.
दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंतीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून या कामात पुन्हा अनुचित प्रकार घडणार नसल्याचे देखील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सुधाकर चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर या संरक्षण भिंतीचे काम पावसाळ्यात देखील सुरू राहणार असून पावसाचा जोर जास्त असल्यास संरक्षण भिंतीच्या काम मंदावण्याची शक्यता आहे. मात्र लवकरात लवकर संरक्षण भितीचे काम करण्यात येणार असल्याचे मत वास्तु विशारद सपना लाखे यांनी व्यक्त केले.