Department of Railway Administration
रेल्वे प्रशासन विभागाकडून गहाळ झालेला लॅपटॉप युवतीकडे सुपूर्त करण्यात आला.  pudhari news network
ठाणे

Thane | सहा महिन्यांत ८५ प्रवाशांना मिळाला हरवलेला किमती ऐवज

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे ८५ प्रवाशांना त्यांचा हरवलेल्या किमती वस्तू परत मिळाल्या आहेत. या किमती वस्तूंमध्ये प्रामुख्याने रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल महत्वाची कागदपत्रे आदींचा समावेश आहे.

  • रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामान रेल्वे स्थानक परिसरात अथवा गाडीत विसरून जातात. मात्र मौल्यवान वस्तू परत मिळेल याची शाश्वती नसते.

  • रेल्वे स्थानकात अशा हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे शोधून देण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

रेल्वे प्रवासातील धावपळीत सामान विसरण्याच्या घटना होत असतात. ठाणे रेल्वे स्थानकात अशा हरवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे शोधून देण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केला जात असून जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यांच्या काळात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, महत्वाची कागदपत्रे असणाऱ्या बंगा अशा तब्बल ८५ प्रवाश्यांना परत केल्या आहेत.

ठाणे स्थानकात प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढते आहे, गाडी पकडताना होणाऱ्या धांदलीत काहीवेळा सोबत असणारे सामान प्लॅटफॉर्म अथवा गाडीत राहण्याची शक्यता असते. सामान परत मिळेल याची कोणतीच शाश्वती नसते. मात्र यामुळे ठाणे स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि प्रामाणिकपणा प्रवाश्यांना अनुभवण्यास मिळाला असून जानेवारी ते जून २०२४ या महिन्यात ८५ प्रवाश्यांना त्यांचे सामान परत केले आहे.

दरम्यान लोकल मेल एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामान स्थानक परिसरात अथवा गाडीत विसरून जातात. सामानात सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, कपडे, महत्वाची कागदपत्रे आढळून येतात. काहीवेळा रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे नियंत्रक कक्षाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार सामान सापडून येत असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने आणि काही वेळा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे रेल्वेकडे जमा झाल्यावर त्या-त्या वस्तूंच्या खऱ्या मालकाचा शोध घेऊन आवश्यक प्रक्रियेनंतर त्यांना ती सुपूर्द करण्याचे कौतुकास्पद काम रेल्वेतील स्थानक व्यवस्थापक, कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी आदी करतात.
प्रवीण पाटील, वरीष्ठ जनसंपर्क अधिकारी.

रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक प्रयत्न

सीएसटी ते कल्याण असा प्रवास करणाऱ्या एका महिलेची बॅग लोकलमध्ये राहिली. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी या महिलेला धीर दिला आणि हेल्पलाईनवर संपर्क करून ही बॅग ठाणे स्थानकात परत मिळवून दिली. दुसऱ्या एका घटनेत मांडवी एक्स्प्रेसने ठाणे स्थानकातून कुडाळला जाणाऱ्या एका कुटुंबाची सुटकेस प्लॅटफॉर्मवर राहिली. सुटकेस मिळेल याची कोणतीच शाश्वती नव्हती. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने ही सुटकेस कुटुंबाला सुपूर्द केली आहे. ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांच्या कार्यालयात सामान गहाळ झाल्याची तक्रार कोणी घेऊन आल्यावर, ती शोधून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात असल्याचे प्रवासी सांगतात. तसा अभिप्राय देखील रेल्वे स्थानक येथे लिहून देत आहेत.

SCROLL FOR NEXT