Drug Addictions
मलंगगड परिसर नशेबाज तरुणांच्या विळख्यात file photo
ठाणे

मलंगगड परिसर नशेबाज तरुणांच्या विळख्यात

मोहन कारंडे

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगड परिसर गेल्या काही दिवसांपासून नशेबाज तरुणांच्या विळख्यात सापडला आहे. मलंगगड परिसरात विविध अमली पदार्थाचे सेवन करणारी तरुण मंडळी दिवसेंदिवस नशेखोरीच्या आहारी जात आहे. मात्र स्थानिक पोलीस प्रशासन या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस प्रशासन सुस्त आणि नशेखोर मस्त, अशी अवस्था या भागात दिसून येत आहे. या परिसरातील नाशाबाजांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कल्याण जवळील श्री मलंगगड भागात सध्या नशा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातील जागोजागी दिवस-रात्र नशा करणारे तरुण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या भागात राहणाऱ्या गावकऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन असलेल्या उल्हासनगर परिमंडळ ४ मधील हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन देऊन या नशेबाज तरुणांच्या विळख्यातून मलंगड परिसरमुक्त करावा, अशी मागणी वारंवार करीत आहेत, मात्र पोलीस प्रशासन या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याने नशेबाज तरुणाईमुळे या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस यंत्रणा या नशेबाज तरुणाईला कधी पोलीसी खाक्या दाखवणार आणि गांजा विक्रेत्यांवर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मलंगगडचा जकात नाका नशेखोरांचा अड्डा

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारांच्या घटना पाहता गुन्हेगार हे विविध अमली पदार्थ सेवन करणारे नशेबाज असून ड्रग्स, गांजा, चरस आदी अमली पदार्थ यांना मिळतो कुठून? हा प्रश्न या घटनेने उपस्थित होत आहे. जागतिक अमली पदार्थ दिनाच्या दिवशीच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणांना ग्रामीण गांजाची विक्री करणारे कधी सापडणार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मलंगगडचा जकात नाका परिसर नशेखोरांचा अड्डाच बनला आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेसोबत नशेखोरांनी वाद देखील घातला होता. मात्र यानंतर देखील पोलीस यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हिल लाईन पोलिसांना हे नशाखोर कधी दिसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

SCROLL FOR NEXT