माणगाव (ठाणे) : देशातील सर्वाधिक पाउस लागलेल्या ताम्हिणी घाटामध्ये चक्रिवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात शनिवारी (दि.4) साडेचारच्या सुमारास अकरा वर्षाची मुलगी वाहून गेली. गुरे चारण्यासाठी गेलेल्या या मुलीला अचानक आलेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे उंबर्डी येथील काळ नदीपात्रात ती वाहून गेली. प्रवाह एवढा वेगाने होता की, तिचा मृतदेह नदीत बऱ्याच किलोमीटरवर खाली सापडला.
४ ऑक्टोबरला सायंकाळी ४.३० च्या सुमारास अश्विनी गेणू ढेबे (वय ११, राहणार गडले दूधवान, ता. मुळशी, जिल्हा पुणे) येथून आपल्या आजीकडे उंबर्डी जिल्हा रायगड येथे आली होती. ही आपल्या आजीसोबत शेतात गेलेली गुरे आणण्यासाठी गेली होती. गुरे घेऊन परतताना मौजे उंबर्डी येथे काळ नदी ओलांडताना अचानक पाण्याचा लोंढा आल्याने ती वाहून गेली. यानंतर तिचा शोध घेतला असता, उशिरा २ किलोमीटर लांब ती वेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री १.४० वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती दगडू चायू कोकरे (वय ३०), रा. उंबर्डी यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. श्री. जाधव हे अधिक तपास करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेने उंबर्डी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ताम्हिणी घाटात यावर्षी भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या भागात ढगफुटीसारखा पाऊस आजही सुरू आहे. शक्ती वादळामुळे कोकणात पावसाचा जोर वाढलाआहे. अचानक येणाऱ्या पुरामुळे दुर्घटना घडत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरोडा वेळागर जवळील समुद्रात अचानक आठजण बुडाले होते. यावेळीही समुद्रातील प्रवाहाचा अचानक झालेला बदल आणि चक्रिवादळसदृश परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.