Crime News Pudhari file photo
ठाणे

Thane Crime : शरीरसुखासाठी दबाव, नकार दिल्यावर घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या

मिरारोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : मिरारोड येथील सिल्वर पार्क परिसरात एका 37 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेची चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. शरीरसुखाची मागणी फेटाळल्याचा राग मनात धरून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले असून, पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला सुमन कांबळे (वय 37, रा. काशिमीरा) या गेल्या 3-4 वर्षांपासून सिल्वर पार्क येथील चंद्रेश अकॉर्ड कॉम्प्लेक्समधील बिल्डिंग नंबर 27 मध्ये गौरव मेश्राम यांच्या घरी घरकाम करत होत्या. गौरव यांचा भाऊ, आरोपी आशिष मेश्राम, हा काही दिवसांपूर्वीच मिरारोड येथे राहण्यास आला होता.

आरोपी आशिषची सुमन यांच्यावर वाईट नजर होती. त्याने वारंवार त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. सुमन यांनी याला कडाडून विरोध केला व हा सर्व प्रकार आपल्या मुलाला सांगितला. त्यानंतर सुमन यांचा मुलगा आशिषला जाब विचारण्यासाठी गेला होता, याच गोष्टीचा राग आरोपीच्या मनात होता.

बुधवारी सायंकाळी 8 च्या सुमारास सुमन या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. आरोपी आशिषने आधीच त्यांची रेकी केली होती. त्या घरात प्रवेश करत असतानाच त्याने पाळत ठेवून मागून प्रवेश केला आणि धारदार चाकूने त्यांच्या पोटावर, छातीवर व मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच मिरारोड पोलिसांनी तातडीने धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत सुमन यांना जवळच्या गुरुकृपा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. मृत सुमन यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आशिष मेश्राम हा मूळचा पश्चिम बंगालचा असून तो तेलंगणातील हैदराबाद येथे असल्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि स्थानिक पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT